इस्लामाबाद, दि. 31 - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना दहशतवाद विरोधी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. तसेच, परवेझ मुशर्रफ यांची संपत्ती जप्त करण्याचे आणि या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.न्यूज डॉट कॉम डॉट पीकेने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने माजी रावळपिंडीचे सीपीओ सौद अझीझ आणि माजी रावळ टाउनचे एस. पी. खुर्रम शहजाद यांना दोषी ठरवत प्रत्येकी 17 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी त्यांना न्यायालयातूनच अटक करण्यात आली आहे. बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर सुमारे 10 वर्षांनंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर 2008 साली हा खटला सुरु झाला. तसेच, त्यांच्या हत्येप्रकरणी रफाकत हुसेन, हुसेन गुल, शेर झमान, ऐतियाज शाह, अब्दुल रशिद या पाचजणांना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. याचबरोबर, प्रांतीय तपास संस्थेने केलेल्या फेरतपासाच्या आधारे परवेझ मुशर्रफ यांना 2009 साली आरोपी केले गेले होते.पाकिस्तान पीपल्स पार्टी पक्षाच्या अध्यक्षा आणि दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिलेल्या बेनझीर भुट्टो यांची 27 डिसेंबर 2007 रोजी रावळपिंडीतील लियाकत बाग भागात सभेदरम्यान गोळीबार आणि बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्यात आली होती.
बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी मुशर्रफ फरारी घोषित, दोन पोलीस अधिकाऱ्यांना 17 वर्षांचा तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 21:05 IST