शियान, (चीन )- परस्पर विश्वास आणि व्यापार यांना चालना देतानाच सीमातंट्याचे ओझे उतरविण्याच्या हेतूने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी चीनमध्ये दाखल झाले असून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेच्या प्राथमिक फेरीतही याच मुद्द्यांवर अत्यंत भरीव चर्चा झाली. परस्पर विश्वास व सीमावाद हा चर्चेचा गाभा राहिला. मोदी व जिनपिंग यांची ही वर्षभरातील तिसरी भेट आहे.भारताचे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर मोदी यांची ही पहिलीच चीन भेट आहे. जिनपिंग यांनी शिष्टाचाराच्या प्रथा बाजूला सारत शियान या स्वत:च्या गावी मोदी यांचे स्वागत केले आणि त्यातूनच मोदी भेटीचे महत्त्वही अधोरेखित केले. एरव्ही चीनमध्ये कोणत्याही परदेशी पाहुण्याचे बीजिंग येथे स्वागत केले जाते. सध्या ११पैकी चार पॉलिट ब्यूरो सदस्य या प्रांतातील असल्याने शियान हे चीनचे राजकीय केंद्र बनले आहे. मोदींनीही शी यांचे स्वागत अहमदाबादच्या वॉटरफ्रंटवर केले होते. परस्पर विश्वासावर चर्चा सुरू असताना मोदी यांनी चीनकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये केल्या जाणाऱ्या ४६ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा, तसेच आर्थिक कॉरीडॉरचा मुद्दा उपस्थित केला. शी यांनी पाक भेटीत या गुंतवणुकीची घोषणा केली होती. चीन व भारत यांच्यातील आणखी एक कळीचा मुद्दा यावेळी मोदी यांनी उपस्थित केला. अरुणाचल प्रदेशातील ( ज्याला चीन दक्षिण तिबेट समजतो) नागरिकांना चीनकडून स्टेपल व्हिसा दिला जातो. हा मुद्दा मोदी यांनी उपस्थित केला; पण परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी त्याचा उल्लेख न करता फक्त राजकीय, आर्थिक, सुरक्षा परिषदेतील सुधारणा व दहशतवादासारख्या जागतिक महत्त्वाच्या मुद्यावर भरीव चर्चा झाली असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनभेटीचे वृत्त प्रसारित करताना भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला वगळल्यामुळे वादंगात भर पडली. चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांचे मूळ गाव असलेल्या झियान शहराला मोदींनी भेट दिली त्यावेळी प्रसारित बुलेटिनमध्ये भारताचा नकाशा चुकीचा दाखवला. चीनने अरुणाचल प्रदेशवर दावा सांगतानाच जम्मू-काश्मीरच्या काही भागावरही हक्क सांगितला असला तरी अशा पद्धतीने चुकीचा नकाशा दाखविण्याचा जोरदार विरोध होत आहे. (वृत्तसंस्था)
मोदींचा दौरा चर्चेने सुरू
By admin | Updated: May 15, 2015 05:09 IST