क्वालालंपूर : मलेशियन विमान बेपत्ता होऊन १०० दिवस उलटल्यानंतरही अद्याप कोणताही थांगपत्ता लागला नाही. मलेशियन सरकारने पुन्हा नव्याने शोधमोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, दोन लेखकद्वयींनी या संपूर्ण घटनाक्रमावर प्रकाश टाकणारे पुस्तक प्रकाशित केले आहे. यात विमान अपघाताच्या चौकशीकडे डोळेझाक केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.‘एमएच ३७० नामक विमान बेपत्ता होऊन १०० दिवस उलटले. मलेशियन सरकारच्या समन्वयाखाली १४ आठवड्यांहून अधिक काळापासून शोधमोहीम राबवली जात आहे. २६ देशांचा समभाग असलेल्या बहुराष्ट्रीय शोधमोहिमेस अद्याप कोणताही सुगावा लागला नाही,’ अशी माहिती मलेशियाचे प्रभारी वाहतूकमंत्री हिशामुद्दीन हुसैन यांनी दिली. सध्या शोधमोहीम मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. बेपत्ता विमानाचा शोध लावण्यासाठी मोठ्या जोमाने काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून २३९ प्रवाशांना घेऊन बीजिंगकडे रवाना झालेले हे विमान गेल्या ८ मार्च रोजी गुढरीत्या बेपत्ता झाले. यात पाच भारतीय, एक कॅनेडियन-भारतीय आणि १५४ चिनी प्रवाशांचा समावेश होता. या घटनेनंतर चीन सरकारला नागरिकांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते.न्यूझीलंडच्या लेखकद्वयींनी पुस्तकाद्वारे एमएच ३७० ही शोकांतिका अपघात नसल्याचा दावा केला आहे. (वृत्तसंस्था)
बेपत्ता मलेशियन विमानाला १०० दिवस पूर्ण
By admin | Updated: June 16, 2014 04:22 IST