नायजेरिया- ब-याचदा मृत व्यक्तीच्या अंतिम इच्छा पूर्ण करायचा राहून जातात. त्यामुळे त्यांचा आत्म्यास शांती लाभत नाही, असंही सांगितलं जातं. नायजेरियातल्या अशाच एका व्यावसायिकानं वडिलांची अनोखी इच्छा त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण केली आहे. व्यावसायिकाचं अजुबाईक असं नाव असून, दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यानं वडिलांच्या मृतदेहासह चक्क नवी कोरी BMW कार दफन केली आहे.वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी BMW गाडीत त्यांचा मृतदेह ठेवून ती दफन केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. तसेच हे वृत्त सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. मुलानं चक्क 60 लाखांची आलिशान BMW कार दफन केल्यानं सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे. आलिशान BMW कार दफन केल्यानं नायजेरियातला तो मुलगा ट्रोलही झाला आहे.पैशांचा अशा प्रकारे अपव्यय करणे हा एक प्रकारचा वेडेपणा असल्याची प्रतिक्रिया एका यूझर्सनं दिली आहे, तर आई-वडील जिवंत असताना त्यांना कारमधून फिरवलं असतं तर ठीक होतं, परंतु कार दफन करणं हा तर मूर्खपणा असल्याचं दुस-या एका युझर्सनं म्हटलं आहे. मागील आठवड्यातही चीनमधल्या एका कुटुंबानं घरातील एका मृत व्यक्तीला आवडत्या गाडीसह पुरलं होतं. माझा मृतदेह शेवपेटीत न ठेवता तो गाडीत ठेवून मगच दफन करावा, असं त्या मृत व्यक्तीनं मृत्युपत्रात लिहिलं होतं.
...म्हणून त्यानं वडिलांच्या मृतदेहासह 60 लाखांची बीएमडब्ल्यू कार केली दफन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 21:08 IST