शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी चीनमध्ये आता ‘लव्ह एज्युकेशन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 07:56 IST

‘काहीही करा; पण मुलं जन्माला घाला’ या आपल्या नव्या धोरणाचा पाठपुरावा करताना चीननं आता चक्क कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये ‘लव्ह एज्युकेशन’चा नवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एक काळ होता, जेव्हा चीननं नारा दिला होता, ‘हम दो, हमारा एक!’ त्यांची वाढती लोकसंख्या आणि आपण म्हणू ती पूर्व दिशा, अशी चीनची हडेलहप्पी पाहता त्यांनी पाहता पाहता आपल्या देशाची लोकसंख्या घटवली. लोकांना एकापेक्षा अधिक मुलं जन्माला घालण्यापासून परावृत्त केलं. त्यांच्या याच पॉलिसीनं या देशाला आता गोत्यात आणलं आहे.या पॉलिसीचा सर्वांत मोठा दुष्परिणाम चीनवर झाला तो म्हणजे त्या देशातील म्हाताऱ्यांची संख्या सातत्यानं वाढते आहे, तर तरुणांची संख्या अतिशय झपाट्यानं घटते आहे. देशातील लोकसंख्या वाढावी, विशेषत: तरुणांनी, नवदाम्पत्यांनी मुलांना जन्म द्यावा, यासाठी अक्षरश: वाट्टेल ते प्रयत्न चीन सरकार करीत आहे; पण त्यात त्यांना अद्यापही यश आलेलं नाही. 

‘काहीही करा; पण मुलं जन्माला घाला’ या आपल्या नव्या धोरणाचा पाठपुरावा करताना चीननं आता चक्क कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये ‘लव्ह एज्युकेशन’चा नवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं कारण एकच, किमान यामुळं तरी देशातील तरुण लग्न आणि आपल्या स्वत:च्या ‘कुटुंबा’साठी प्रेरित होतील, मुलं जन्माला घालण्याचं महत्त्व त्यांना कळेल!

चीनमधील तब्बल ५७ टक्के तरुण लग्न करण्यास इच्छुक नाहीत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानं ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. त्याची मुख्य कारणं तीन. बेरोजगारी, करिअर घडवण्यातल्या अडचणी आणि जोडीदाराचं नको असलेलं ओझं. आपल्या जुन्या निर्णयाचा चीनला पश्चात्ताप होतो आहे. चीनचं आपल्याच देशातील तरुणाईला हर प्रकारे आमिष दाखवून झालं, प्रसंगी दमदाटी, धाकदपटशा दाखवून झाला; पण तरुणाई बधली नाही, ती नाहीच. त्यामुळेच चीननं तरुणांना आता यासंदर्भातलं रीतसर शिक्षणच द्यायचं ठरवलं आहे. 

सरकारनं युनिव्हर्सिटीज, कॉलेजेसना ‘आदेश’ दिला आहे, ‘लव्ह एज्युकेशन’च्या अभ्यासक्रमात तरुणांना प्रेमाचं, लग्नाचं, प्रजननाचं महत्त्व पटवून द्या. त्यांच्यात कुटुंबाविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार करा, त्यांच्यातील इंटिमेट रिलेशनशिप्स वाढीस लावा. तरुण आणि तरुणी यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी, ते जास्तीत जास्त वेळ आणि वेळा एकत्र यावेत, यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी वेगवेगळ्या केस स्टडीज त्यांना अभ्यासाला द्या, ग्रुप डिस्कशन्स आयोजित करा आणि बरंच काही...

चीन सरकारची यात सक्रिय भूमिका आहे आणि सर्व विद्यापीठांवर, कॉलेजेसवर ते आता लक्ष ठेवणार आहे. चीनच्या स्टेट कौन्सिलनं लोकसंख्येतील घट थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. तरुणांमध्ये योग्य वयात लग्न आणि मुलं जन्माला घालण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी हवे ते सर्व स्रोत वापरा, कितीही पैसा खर्च झाला, तरी चालेल; पण देशाची लोकसंख्या वाढवा, असा आदेशच सर्व संबंधितांना दिला आहे. दुसरीकडं चिनी तरुणाईला आता कसलंच आकर्षण नको आहे. त्यांना एकटं राहणंच आता अधिक ‘फायदेशीर’ आणि हिताचं वाटू लागलं आहे. 

चीनमध्ये कॉलेज प्रवेशासाठी ‘गाओकाओ’ नावाची नॅशनल एंट्रन्स परीक्षा घेतली जाते. चिनी साहित्य, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी, इतिहास, राजकारण इत्यादीविषयीचे प्रश्न यात विचारलेले असतात. ‘जगातील सर्वांत कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक’ अशी या परीक्षेची ख्याती आहे. लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात; परंतु फक्त काही हजारांना प्रवेश मिळतो. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपल्याच जगण्याची मारामार, तिथं लग्न करून जोडीदाराचं ‘ओझं’ सांभाळण्याची बऱ्याच तरुणांची तयारी नाही. ज्या शहरांमध्ये तुलनेनं जास्त संधी आहेत, ज्या घरांत तुलनेनं जास्त श्रीमंती आहे, तिथं लग्नाचं प्रमाण जास्त घटलं आहे, हा आणखी एक विरोधाभास तिथे पाहायला मिळतो. चीनमध्ये गेल्या वर्षभरात लग्न करणाऱ्यांची संख्या तब्बल १६.६ टक्क्यांनी घसरली. गेल्यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत चीनमध्ये ५७ लाख विवाह झाले होते, त्या तुलनेत २०२४ च्या पहिल्या तिमाहीत फक्त ४७ लाखच विवाह झाले. चीनमध्ये लग्नासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं जात असलं तरीही २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये लोकसंख्या वीस लाखांनी घटून १४०.९ कोटी इतकी झाली.

७ वर्षांत लोकसंख्येत ५० लाखांची घट!चीनमध्ये गेल्या सात वर्षांत लोकसंख्या तब्बल ५० लाखांनी घटली. चीनमधल्या बालवाड्यांना आणि शाळांना तर मुलं मिळण्याची अक्षरश: मारामार झाली आहे. त्यामुळं अनेक शाळा बंद पडत आहेत. तिथं २०२२ मध्ये प्रतिएक हजार व्यक्तींमागे ६.७७ मुलं जन्माला येत होती. तो दर आता ६.२९ इतका झाला आहे. आतापर्यंतचा त्यांचा हा सर्वाधिक नीचांकी जन्मदर आहे. अशा परिस्थितीत ‘लव्ह एज्युकेशन’कडं चीन सरकार अतिशय आशेनं पाहत आहे.

टॅग्स :chinaचीन