अमेरिकेने युद्धविराम करूनही इस्रायलने गाझा पट्टीवर नरसंहार सुरुच ठेवल्याने आता इस्रायलचा तिरस्कार करणारे वाढू लागले आहेत. इस्रायलवरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात आत जोरदार राडा पहायला मिळाला आहे. कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. या कर्मचाऱ्यांनी मायक्रोसॉफ्टवर गंभीर आरोप केले आहेत. प्रकरण एवढे हाताबाहेर गेले की पोलिसांना बोलवावे लागले आहे. पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी आंदोलन करत होते. यामुळे मायक्रोसॉफ्ट अडचणीत आली होती. मंगळवारी कंपनीच्या मुख्यालयातील मधील जागेमध्ये सुमारे ३५ आंदोलक जमले होते. मायक्रोसॉफ्टच्या विनंतीवरून ते निघून गेले, परंतू बुधवारी त्यांनी कंपनीचा लोगो लाल रक्ताच्या रंगाने रंगविला होता. इस्रायल गाझावर हल्ले करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे तंत्रज्ञान वापरत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला.
कंपनीने अखेर पोलिसांना बोलावले होते. पोलिसांनी त्यांना बेकायदेशीरपणे उपस्थित असल्याचे सांगितल्यावर आंदोलकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली, असे रेडमंड पोलिसांनी सांगितले. निदर्शकांनी कंपनीच्या मालमत्तेचे नुकसानच केले नाही तर पोलिसांशीही संघर्ष केला.
इस्रायल गाझा आणि वेस्ट बँकेतील पॅलेस्टिनींवर पाळत ठेवत आहे, यासाठी मायक्रोसॉफ्टने गोळा केलेल्या फोन डेटासाठी अझूर क्लाउड प्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याचे वृत्त ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन' ने दिले होते. यानंतर मायक्रोसॉफ्टमध्येच हा विरोध सुरु झाला होता. मायक्रोसॉफ्टने याची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.