लॉस एंजेलिस : लॉस एंजेलिस येथून अटलांटा येथे जाणाऱ्या डेल्टा एअरलाईन्सच्या फ्लाइट डीएल४४६ ला उड्डाणानंतर थोड्याच वेळात डाव्या बाजूच्या इंजिनाला आग लागल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. बोईंग ७६७-४०० (नोंदणी एन८३६एमएच) द्वारे चालवले जाणारे फ्लाइट डीएल४४६ या विमानच्या इंजिनात आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर वैमानिकांनी तत्काळ आपत्कालीन स्थिती जाहीर केली आणि विमान पुन्हा लॉस एंजेलिस इंटरनॅशनल विमानतळावर उतरवले.
विमान उड्डाणानंतर काही वेळात पॅसिफिक महासागराच्या दिशेने गेले होते. मात्र, आग लागल्याचे संकेत मिळताच वैमानिकांनी तातडीने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आणि त्वरित परतीसाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी)शी समन्वय साधला. विमान डाउनी आणि पॅरामाउंट शहरांवरून परत फिरले. विमानाने संपूर्ण उड्डाणादरम्यान स्थिर उंची आणि वेग राखला.
डेल्टाशी संबंधित दुसरी घटना विमान लँड झाल्यावर आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि आग पूर्णतः विझविण्यात आली. या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याची नोंद नाही. डेल्टाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “इंजिनाशी संबंधित अडचणीचा संकेत मिळाल्यामुळे हे निर्णय घेण्यात आले.” संबंधित विमानाला दोन जनरल इलेक्ट्रिक सीएफ६ इंजिने आहेत. या घटनेची चौकशी फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन एफएए करत आहे.
या वर्षी डेल्टा एअर लाईन्सशी संबंधित इंजिनमध्ये आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. जानेवारीमध्ये फ्लाइट डीएल१०५, एअरबस ए३३०निओ, ब्राझीलच्या सो पाउलोला जाताना अशाच प्रकारच्या समस्येमुळे टेकऑफनंतर लगेचच अटलांटाला परतावे लागले. या प्रकारांमुळे विमान प्रवाशांमध्ये कंपनीच्या सेवांबाबत गोंधळाचे वातावरण आहे.