मुंबई : लालबाग परळमधील अवघ्या १३ वर्षांच्या दूर्वांकाने जपान येथील आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. लालबागमधील गुरुकुल या संस्थेत चित्रकलेचे धडे गिरविणा-या या बालचित्रकाराने हा सन्मान पटकाविल्याने लालबाग-परळवासीयांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.जपानच्या जपान क्वॉलिटी अॅश्युरन्स आॅर्गनायझेशन इंटरनॅशनल एन्व्हायर्नमेंटल चिल्ड्रेन्स ड्रॉइंग कॉन्टेस्ट ही स्पर्धा गेली १४ वर्षे होते आहे. या स्पर्धेत यंदा ‘आम्ही आमच्या सुंदर जगाचा भाग आहोत’ असा विषय होता. या स्पर्धेत गुरुकुलच्या १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ९६ देशांतील १७ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याने ही बालचित्रकारांची स्पर्धा अतिशय चुरशीची झाली होती. स्पर्धेच्या स्वरूपाप्रमाणे १७ हजार स्पर्धकांपैकी केवळ ६० जणांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या ६० विद्यार्थ्यांमध्ये गुरुकुलच्या दूर्वांका मनिष सुरती या चिमुरडीचा समावेश आहे.दूर्वांका ही परळच्या सेंट पॉल कॉन्व्हेंट शाळेत आठवी इयत्तेत शिकत आहे. तिने आपल्या चित्रात पृथ्वीवर प्राणी, पक्षी, वृक्ष, नद्या यांच्यासह बालके आनंदात राहत असल्याचे दाखविले आहे. यापूर्वीही संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत पारितोषिके पटकावली आहेत. याशिवाय, समाजातील तत्कालीन घटना, प्रसंग याचे भान राखून हे बालचित्रकार आपल्या कलाकृतींतून वेळोवेळी व्यक्त होताना दिसतात.
जपानच्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत लालबागच्या मुलीची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 02:48 IST