रशियाच्या समुद्रात ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर पुढीच तीन ते चार तासांत ३० हून अधिक भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. रशियाच्या किनाऱ्यावर तसेच अमेरिकेतील जपान आणि कॅलिफोर्नियामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. हवाईमध्ये सहा फूट उंच समुद्राच्या लाटा दिसल्याचे गव्हर्नर जोश ग्रीन यांनी सांगितले आहे. तर पॅसिफिक समुद्रकिनाऱ्यांच्या इतर भागात तीन मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रशियाच्या पूर्वेकडील कामचटकामध्ये हे भूकंप होत आहेत. जपानमधील चिबा येथील कुजुकुरी बीचवर त्सुनामीच्या छोट्या लाटा दिसू लागल्या आहेत. तर होक्काइडो येथे त्सुनामीचा इशारा जारी झाल्यानंतर लोक इमारतींच्या छतावर जमले आहेत. इक्वेडोरमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त उंचीच्या समुद्राच्या लाटा उसळू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. हवाईच्या समुद्रकिनाऱ्यावर गेलेले लोक परतू लागले आहेत. हवाई, चिली, जपान आणि सोलोमन बेटांमध्ये आणि आसपास एक ते तीन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
जपानमधील १६ ठिकाणी त्सुनामीच्या लाटा आल्याची नोंद झाली आहे. हवाईमध्ये तीन ते १२ फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला त्सुनामीचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला होता. परंतू, आता त्यांना या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.
४ नोव्हेंबर १९५२ रोजी ९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे कामचटका शहराचे नुकसान झाले होते. यानंतरचा हा या भागातील सर्वात मोठा भूकंप आहे. या महिन्यात या भागात पाचवेळा हादरे बसले आहेत.