क्योटो : जपानच्या क्योटो शहरातील एका अॅनिमेशन स्टुडिओला लावण्यात आलेल्या आगीत ३३ जण मरण पावले असून ११ जण अत्यवस्थ आहेत. या स्टुडिओत एक माणूस गुरुवारी सकाळी शिरून त्याने पेट्रोल ओतून इमारतीला आग लावली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या दुर्घटनेबद्दल जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या स्टुडिओच्या तीन मजली इमारतीत सकाळी मोठी आग लागली. त्यानंतर जोरदार स्फोट होऊन ही आग झपाट्याने पसरली. या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर अनेक लोक अडकलेले होते व जीव वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. या अॅनिमेशन स्टुडिओमध्ये ७० कर्मचारी होते. त्यातील ३६ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील ११ जण अत्यवस्थ असून त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)ही आग लावणारा या स्टुडिओचा माजी कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही. इमारतीला आग लावणारा माणूसही भाजला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.>कडक कारवाई करण्याची मागणीक्योटो अॅनिमेशन किंवा क्योअनी या नावाने प्रसिद्ध असलेला हा स्टुडिओ १९८१ साली सुरू करण्यात आला. केआॅन, दी मेलाँचोली आॅफ हारुही सुझूमिया या दोन गाजलेल्या कार्यक्रमांची निर्मिती या स्टुडिओने केली आहे. आग लावण्यामागचे नेमके कारण काय आहे, याचा शोध सुरू आहे.>क्योटो अॅनिमेशन स्टुडिओतील दुर्घटनेबद्दल जपानमधील असंख्य लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. ही आग लावून निरपराध्यांचा बळी घेणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जपानमध्ये स्टुडिओला आग, ३३ मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 04:23 IST