मध्य पूर्वेतील कतारची राजधानी असलेल्या दोहावर बॉम्बिंग केल्यानंतर, आता इस्रायलने येमेनवर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. आगामी काही तासांत, येमेनमधील प्रमुख बंदरांना लक्ष्य केले जाईल, अशी घोषणा इस्रायलने केली आहे. महत्वाचे म्हणजे, येमेनच्या लाल समुद्रावरील होदेइदाह बंदरही रिकामे करण्याचा आदेशही देण्यात आला असल्याचे इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी, गेल्या आठवड्यातही इस्रायलने येमनमध्ये हाहाकार माजवला होता. येमनची राजधानी सना येथे इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 46 जण मारले गेले होते. यांत 26 जण माध्यम संस्थांचे कर्मचारी होते. येमेनच्या हुथी गटाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात मध्य सनामधील तहरीर चौकात असलेल्या 26 सप्टेंबर आणि अल-येमेन या दोन वृत्तपत्रांची कार्यालये पूर्णपणे भूई सपाट झाली आहेत. यासंदर्भात बोलताना, हल्ल्यात 165 लोक जखमी झाले असून यांत महिला आणि मुलांचाही समावेश असल्याचे हुथी नियंत्रित आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, त्यांनी लष्करी छावण्या, हुथीची जनसंपर्क मुख्यालये आणि एका इंधन साठवणूक केंद्राला लक्ष्य केले होते. एवढेच नाही, तर ही कारवाई हुथी गटाने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात करण्यात आल्याचेही, इस्रायली सैन्याने म्हटले आहे. दरम्यान, हुथीचा लष्करी प्रवक्त्या याह्या सरियाने या हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे, याह्याचे कार्यालयही गेल्या आठवड्यातील हवाई हल्ल्यात भूई सपाट झाले आहे.