तेलअवीव - इस्त्रायल सैन्यानं युद्धविरामानंतरही गाझावर सर्वात मोठा हल्ला केला आहे. सैन्यानं मंगळवारी अवघ्या १० मिनिटांत एका पाठोपाठ एक ८० हून अधिक बॉम्ब डागत टार्गेट उद्ध्वस्त केले आहे. इस्त्रायलच्या लढाऊ विमानांनी २ मिनिटांत सर्व टार्गेट निस्तनाबुत केले. या हल्ल्यात ४०० हून अधिक लोक मारले गेले. यात हमासच्या मध्यस्तरीय बटालियन कमांडर आणि कंपनी लीडर्सला निशाण्यावर ठेवले होते. इस्त्रायली हल्ल्यात हमासच्या शूरा परिषदेचे प्रमुख, मंत्री आणि हमास पंतप्रधानांना लक्ष्य करण्यात आले. यापुढेही हमासवर भीषण हल्ले होत राहतील असा इशारा इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे.
एपी रिपोर्टनुसार, इस्त्रायलने मंगळवारी गाझा पट्टीवर हवाई हल्ले केले. ज्यात कमीत कमी ४१३ फिलिस्तानी लोकांचा मृत्यू झाला. त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या हल्ल्यामुळे शांतता चर्चेत अडथळा निर्माण झाला आहे. जानेवारीत झालेल्या हल्ल्यापेक्षा हा हल्ला प्रचंड मोठा होता. ज्यात १७ महिन्यापासून जारी असलेले युद्ध आता आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हमासने युद्धबंदी करारात बदल करण्याच्या मागण्या नाकारल्या त्यामुळे हा हल्ला केल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे.
जमिनी सैन्य अभियान सुरू करणार
आम्ही हे अभियान अनिश्चित काळापर्यंत चालवू आणि त्याला आणखी व्यापक केले जाईल असं इस्त्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले तर नेतन्याहू यांचा युद्ध पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बंधकांना मृत्यूची शिक्षा देण्यासारखा आहे. या हल्ल्यात ५६० लोक जखमी झाले आहेत. बचाव पथके अद्यापही मलब्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढत आहेत. इस्त्रायली सैन्याने गाझाच्या पूर्व भागातील लोकांना बाहेर जाण्याचे आदेश दिलेत त्यामुळे लवकरच बैत हनून आणि दक्षिण भागातही जमिनी सैन्य अभियान सुरू करण्याचा इरादा इस्त्रायली सैन्याचा आहे.
सीजफायरच्या पहिल्या टप्प्यात २५ इस्त्रायली बंधकांना सोडवण्याच्या बदल्यात २ हजार फिलिस्तानी कैद्याची सुटका झाली होती. परंतु दुसऱ्या टप्प्यात सहमती बनली नाही ज्यात ५९ बंधकांची सुटका आणि युद्ध संपवण्यावर चर्चा होणार होती. इस्त्रायली सैन्याने पूर्णपणे परत जाणे आणि युद्धबंदी हवी असं हमासचं म्हणणं होते तर आम्ही हमासच्या सैन्याचा ढाचा पूर्णपणे नष्ट करू, सर्व बंधकांना सुखरूप सोडवेपर्यंत लढाई जारी ठेवू असं इस्त्रायलने म्हटलं.
गाझा विध्वंसाकडे...
इस्त्रायल आता हमासविरोधात आणखी सैन्य बळाचा वापर करेल असं पंतप्रधान नेतन्याहू यांनी सांगितले. रमजान महिना सुरू असताना हा हल्ला झाला आहे. त्यामुळे युद्धाची तीव्रता आणखी वाढली आहे. या हल्ल्यामुळे हमासच्या ताब्यातील इस्त्रायली बंधकांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. नेतन्याहू यांच्या धोरणाविरोधात इस्त्रायलमध्येही विरोध प्रदर्शन करण्यात आले. गाझा पट्टीवरील हल्ल्यापूर्वी इस्त्रायलने अमेरिकेचा सल्ला घेतला होता. अमेरिकेने या हल्ल्याचे समर्थन केले आहे.
मुस्लीम देश संतापले
हा हल्ला नरसंहार असून याची थेट जबाबदारी अमेरिकेची आहे. या हल्ल्यामुळे शांततेला धोका निर्माण झाला आहे असं इराणने म्हटलं. हे हल्ल्याचं अंतिम रूप आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने यात हस्तक्षेप करायला हवा असं तुर्कीने प्रतिक्रिया दिली. इस्त्रायलचा हल्ला युद्धबंदीचं उल्लंघन आहे. शांततेसाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांना अयशस्वी करण्याचा डाव आहे असं इजिप्तने म्हटलं. गाझावर झालेल्या हल्ल्याने हिंसा वाढण्याची शक्यता आहे. निर्दोष लोकांचा जीव घेणे बंद व्हायला हवे असं संयुक्त अरब अमीरात(UAE) ने सांगितले आहे.