चार दिवसांपूर्वी अमेरिकेने घोषित करूनही हमासोबत युद्धबंदी करणार नाही असे म्हणणारा इस्रायल आज नरमला आहे. हमासोबतच्या युद्धबंदीला तयार असल्याचे आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केले आहे. यामुळे आता मिडल ईस्टला १५ महिन्यांनी शांतता अनुभवता येणार आहे. ही युद्धबंदी अटीची असून दोन्ही बाजुने एकमेकांना अटी घालण्यात आल्या आहेत.
हमासने इस्रायलवर हल्ला करून शेकडो लोकांना ओलीस केले होते. यानंतर इस्रायलने युद्ध छेडले होते. हमासच्या प्रमुखांना संपविण्यात आले असून भारतासह अनेक देशांनी हे युद्ध थांबावे असे आवाहन केले होते. अमेरिका इस्रायलला शस्त्रास्त्रांसाठी मदत करत होती. अखेरीस अमेरिकेत नवीन सरकार येत असल्याने ते सत्तेत बसण्यापूर्वीच ही युद्धबंदी लागू झाली आहे.
हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी आज ३ जणांना सोडण्यात येणार आहे. गेल्या ८ महिन्यांपासून युद्धबंदी करण्याचे प्रयत्न केले जात होते. परंतू इस्रायल काही केल्या ऐकायला तयार नव्हता. या युद्धात गाझा पट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो इमारती नेस्तनाभूत झाल्या आहेत. आता तिथे पुन्हा नवीन घरे, इमारती, पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. यासाठी लाखो कोटी रुपये लागणार आहेत. यासाठी संयुक्त राष्ट्रे महत्वाची भूमिका निभावणार आहेत.
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दुटप्पी भूमिका घेतली होती. ते एकीकडे युद्धाला मदतही करत होते, दुसरीकडे युद्ध थांबविण्याचाही प्रयत्न करत होते. २० जानेवारीला अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेणार आहेत. त्यापूर्वीच इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबविण्यात यश आले आहे.