Donald Trump H-1B Visa: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी एच-१बी व्हिसावर मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्याची घोषणा केली. हे एकवेळ शुल्क असेल जे फक्त नवीन अर्जदारांना लागू होईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. व्हाईट हाऊसने आता ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले. एच-१बी व्हिसासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी १००,००० डॉलर (अंदाजे ८८ लाख रुपये) शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा भारतीयांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून त्यामुळे अनेकांचे नुकसान झालं आहे.
परदेशात अडकलेल्या अनेक भारतीय एच-१बी धारकांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय धक्कादायक आहे. ही घोषणा झाल्यानंतर मोठ्या टेक कंपन्यांनी परदेशात असलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना एका दिवसात परत येण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे त्यांना कुटुंबाचे मेळावे आणि दीर्घकाळापासूनच्या नियोजित सहली सोडून जवळच्या विमानतळावर धाव घ्यावी लागली.
या कठोर निर्णयानंतर सारमुच नावाच्या रेडिट युजरने अमेरिकेबाहेर अडकून पडताना त्याला आणि इतर एच-१बी व्हिसा धारकांना आलेल्या अडचणींबद्दल सविस्तर माहिती दिली. शनिवारी अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या प्रमुख टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३१ पर्यंत अमेरिकेत परतण्यास सांगितले तेव्हा गोंधळ निर्माण झाला.
"ज्यांच्याकडे हृदय नाही त्यांच्यासाठी हा लाजिरवाणा निर्णय आहे. तुम्हाला माझ्या आईला रडताना पाहण्याची गरज नव्हती कारण ती मला अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच पाहणार होती. आम्ही वर्षानुवर्षानंतर पहिल्यांदाच एका आठवड्यासाठी एकत्र येणार होतो. हे चुकीचे आहे. हा भावनिक धक्का खूप मोठा आहे, कुटुंबे विभक्त झाली आहेत आणि महत्त्वाचे क्षण गमावले आहेत. व्हिसाच्या पलीकडेही जीवन आहे, कारण आपण सर्व मानव आहोत," असं रेडिट युजरने म्हटलं.
दरम्यान, व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की कंपन्यांना त्यांच्या एच-१बी कामगारांना अमेरिकेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी जास्त शुल्क भरावे लागणार नाही, ज्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. पण तोपर्यंत नुकसान झाले होते. शुक्रवारी उशिरा ट्रम्पच्या घोषणेनंतरच्या तासांचे वर्णन अनेक एच-१बी व्हिसा धारकांनी केले. अनेकांना विमानात चढण्याची वाट पाहत असताना या व्हिसा नियमातील बदलांबद्दल माहिती मिळाली, ज्यामुळे काहींनी त्यांचे प्लॅन रद्द करावे लागले. कारण मोठ्या टेक कंपन्यांनी पुढील सूचना येईपर्यंत एच-१बी व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांना अमेरिका सोडण्यास मनाई केली . या अनिश्चिततेमुळे लग्नाच्या योजनाही रद्द कराव्या लागल्या.
"ही प्रवास बंदी आहे. जरी एखाद्याच्या पासपोर्टवर वैध एच-१बी व्हिसा असला तरीही, जरी तो प्रवास करत असला किंवा सुट्टीवर असला तरी, त्याच्याकडे अतिरिक्त देयकाचा पुरावा असल्याशिवाय त्याला अमेरिकेत प्रवेश नाकारला जातो. ही प्रक्रिया काय आहे, तपशील काय आहेत हे कोणालाही माहिती नाही. संपूर्ण गोंधळ आहे. विमानतळावर बोर्डिंग लाईन्समध्ये उभे असलेले लोक, उद्या त्यांच्या लग्नासाठी निघणारे लोक त्यांचा प्रवास रद्द करत आहेत कारण त्यांना काय करावे हे माहित नाही, " असेही एका व्यक्तीने म्हटलं.