ऑनलाइन टीम
ग्लास्गो, दि. ३ - ग्लास्गो येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट करत भारताचे नाव रोशन केले असतानाच भारतीय अधिका-यांमुळे भारताची मान शरमेने खाली गेली आहे. दोन भिन्न घटनांमध्ये भारताच्या दोन अधिका-यांना स्कॉटलंड पोलिसांनी अटक केली असून यातील एका अधिका-यावर महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे.
स्कॉटलंड येथील ग्लास्गो येथे राष्ट्रकुल स्पर्धा सुरु असून या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तब्बल ६१ पदक जिंकून भारताचा झेंडा रोवला. मात्र भारतीय अधिका-यांनी बेजबाबदार वर्तन करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्कीच केली आहे. कुस्तीचे पंच विरेंद्र मलिक यांच्या विरोधात एका महिला कर्मचा-याने असभ्य वर्तन केल्याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास स्कॉटलंड पोलिसांनी मलिक यांना अटक केली आहे तर मद्यधूंद अवस्थेत विना परवाना वाहन चालवल्याप्रकरणी भारतीय ऑलिंपिक महासंघाचे सचिव राजीव मेहता यांनादेखील पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर नेमके काय कलम लावण्यात आले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्कॉटलंड पोलिसांच्या प्रवक्त्यांनी घटनेला दुजोरा दिला असला तरी त्यावर अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला आहे. या दोघांनाही उद्या न्यायालयासमोर हजर केले जाईल. हे दोघेही राष्ट्रकुलसाठी गेलेल्या भारतीय पथकातील अधिकृत सदस्य नव्हते. हे दोघेही खासगी हॉटेलमध्ये उतरले होते असे भारतीय अधिका-यांनी सांगितले. तर केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या घटनेत तथ्य असेल तर संबंधीतांवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.
भारतीय दुतावासाचे अधिकारीही स्थानिक सरकारी यंत्रणेच्या संपर्कात असून ते या घटनेविषयी अधिक माहिती घेत आहेत. दुतावासातर्फे एडनबर्ग येथे एका अधिकारी पाठवण्यात आला आहे. हा अधिकारी स्थानिक पोलिसांकडून घटनेविषयीची संपूर्ण माहिती घेत राहील असे दुतावासातील वरिष्ठ अधिका-यांनी स्पष्ट केले.