अमेरिकेत अवैधरित्या राहत असलेल्या सात लाखांपैकी १०४ भारतीयांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देत विमानात हाता पायाला बेड्या घालून भारतात पाठवून देण्यात आले. ही तर फक्त सुरुवात आहे. भारतीयांच्या पायातील आणि हातातील बेड्या पाहून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच एका अमेरिकन अधिकाऱ्याने लष्करी विमानातून भारतीयांना परत पाठविण्याचा व्हिडीओ जारी करत या लोकांना अवैध एलियन्स असे म्हटले आहे.
यूएस बॉर्डर पेट्रोल चीफ मायकेल डब्ल्यू. बँक्स यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यूएसबीपी आणि भागीदारांनी बेकायदेशीर एलियन्सना भारतात यशस्वीरित्या परत पाठवले आहे. अमेरिकेतून आतापर्यंतचे हे सर्वात लांबचे उड्डाण होते. जर तुम्ही बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी या ट्विटमध्ये दिला आहे.
अमेरिकेने पाठविलेल्यांमध्ये ३१ पंजाबचे, ३० हरियाणाचे, २७ गुजरातचे, ३ उत्तर प्रदेशचे, ४ महाराष्ट्राचे आणि २ चंदीगडचे रहिवासी आहेत. भारतासाठी ही शरमेची बाब आहे. मित्र म्हणवणाऱ्या अमेरिकेने या लोकांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली आहे. यामुळे भारतीयांविषयी अमेरिकन काय विचार करतात या गोष्टीही स्पष्ट झाल्या आहेत. आता यावरून होत असलेल्या टीकेवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत उत्तर दिले आहे.
जयशंकर काय म्हणाले...नागरिक परदेशात बेकायदेशीरपणे राहत असतील तर त्यांना परत घेण्याची जबाबदारी सर्व देशांची आहे. अमेरिकेतून भारतीयांना परत पाठविण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, हे काही नवीन नाही. निर्वासन दरम्यान महिला आणि मुलांना बांधून ठेवले जात नाही, हे अमेरिकेने आम्हाला सांगितले होते. अमेरिकेत २०१२ पासून एसओपी लागू आहे, यानुसार निर्वासित लोकांना विमानांमधून बांधूनच नेले जाते, त्या प्रमाणेच भारतीयांनाही पाठविण्यात आले.