अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. पण दुसरीकडे, इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. या संघर्षाला विराम देण्यासाठी युद्धबंदीचे अनेक प्रयत्न झाले असले तरी, आता इस्रायल गाझावर अंतिम हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी गाझावर विजय मिळवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे सांगितले आहे.
इस्रायलची तयारी झाली पूर्णगेल्या दोन वर्षांपासून गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा सुरू आहे. युद्धबंदीचा प्रस्ताव सध्या इस्रायलकडे पाठवण्यात आला आहे. पण, इस्रायलने या प्रस्तावावर प्रतिसाद देण्याऐवजी, गाझामध्ये अतिरिक्त सैन्याची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने ६०,००० अतिरिक्त राखीव सैनिक गाझामध्ये पाठवले आहेत. यामुळे या भागातील इस्रायलच्या सैन्याची संख्या दुप्पट होणार आहे.
नेतान्याहूंचा ठाम नकारइस्रायलच्या मुख्य युरोपियन मित्र राष्ट्रांना वाटते की, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आता युद्धबंदीच्या प्रस्तावाला स्वीकारले पाहिजे. परंतु, नेतान्याहू यांनी याला ठाम नकार दिला आहे. “जोपर्यंत हमासचे अस्तित्व आहे, तोपर्यंत युद्धबंदीसारखा कोणताही करार होऊ शकत नाही,” असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, रशिया-युक्रेन, आर्मेनिया-अझरबैजान यांसारख्या युद्धांमध्ये मध्यस्थी करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनीही नेतान्याहूंच्या भूमिकेशी सहमती दर्शविली आहे.
हमासच्या भूमिकेत लवचिकताइस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदीचा प्रस्ताव इजिप्त आणि कतार या देशांनी ठेवला आहे, जे सुरुवातीपासूनच या प्रकरणात मध्यस्थी करत आहेत. हमासने या प्रस्तावाला अनुकूल प्रतिसाद दिला असून, ते युद्धबंदीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र, इस्रायलच्या उत्तराची अजूनही प्रतीक्षा आहे.
इस्रायलने कोणत्याही कराराआधी हमासला गाझामधून पूर्णपणे संपवायचे ठरवले आहे, असे मानले जात आहे. त्यामुळेच युद्धबंदीचा निर्णय घेण्याआधीच त्यांनी मोठी सैन्य फौज तैनात केली आहे. याचा अर्थ, चर्चा आणि युद्धबंदीचा निर्णय झाला तरी इस्रायलची स्थिती अधिक मजबूत राहील.