दक्षिण अमेरिकेतील छोटा देश असलेल्या गुयानामध्ये हिंदूंची संख्या लक्षणीय आहे. मात्र आता या हिंदूंचं वास्तव्य असलेला गुयानामधील एस्सेकिबो या भागावर शेजारील देशाची वक्रदृष्टी पडली आहे. व्हेनेझुएलाचे शक्तिशाली राष्ट्रपती निकोलस माडुरो यांनी देशातील सरकारी स्वामित्व असलेल्या कंपन्यांना गुयानामधील एस्सेकिबो क्षेत्रात तेल, गॅस आणि खाणींचा शोध आणि उत्खनन त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहे. हे आदेश व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती माडुरो यांनी १ लाख ५९ हजार चौकिमी क्षेत्र पुन्हा मिळवण्यासाठी सार्वमत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका दिवसांनंतर देण्यात आले आहेत. हा भाग गुयानाच्या एकूण क्षेत्रफळाच्या दोन तृतियांश एवढा आहे. तसेच तो ब्राझीलच्या सीमेला लागून आहे.
विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार गुयानामध्ये दोन ते अडीच लाख हिंदूंचं वास्तव्य आहे. या भागात असलेल्या देशांमधील सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेला हा देश आहे. २०१२ च्या आकडेवारीनुसार एस्सेकिबोमधील सुमारे ३७ टक्के लोकसंख्या ही हिंदू धर्माचं पालन करते. येथील हिंदू समुदाय धार्मिक कार्यक्रमांवेळी यज्ञ करतो, सामुदायिक कार्यक्रम आणि समारंभ आयोजित करत असतो. येथील हिंदू समाजाने गुयनाची राजधानी असलेल्या जॉर्जटाऊन येथे आयोजित वार्षिक दिवाळीच्या कार्यक्रमातील मोटारसायकल स्पर्धेमध्ये अनेक बक्षिसंही मिळवली होती.
या भागावर कब्जा करण्याच्या व्हेनेझुएलाच्या प्रयत्नांचा या भागात राहणाऱ्या हिंदूंवर काय परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती माडुरो यांच्यावर विरोधरकांवर व्यापक निर्बंध आणि इतर आरोप सातत्याने होत असतात. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनच्या एका ब्लॉग पोस्टनुसार गुयानातील हिंदू अनेक आव्हानांचा सामना करून आपल्या प्रथा आणि परंपरा जीवित ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
व्हेनेझुएलाची राजधानी काराकस येथे झालेल्या जनमत संग्रहानंतर माडुरो यांनी व्हेनेझुएलातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या स्थानिक सहाय्यक कंपन्यांच्या निर्मितीचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये तेलक्षेत्रातील दिग्गज कंपनी पीडीव्हीएसए आणि खाणकाम समूह कॉर्पोरेशन व्हेनेजोलाना डी गुयाना यांचा समावेश आहे. त्यांनी या कंपन्यांना एस्सेक्विबोतील संपूर्ण क्षेत्रात तेल, गॅस आणि खाणींचा शोध आणि वहनासाठी परिचालनाचा परवाना देण्यास सांगितले आहे.