काठमांडू - नेपाळमध्ये Gen Z आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर अवघ्या २ दिवसांत केपी शर्मा ओली यांचं सरकार कोसळले. बुधवारी नेपाळ सैन्याचे प्रमुख अशोक राज सिग्देल यांनी रस्त्यावर सैनिकांना उतरवून शांतता आणण्याचा प्रयत्न केला. बुधवारी Gen Z चे आंदोलन शांत झाले. गुरुवारी सकाळी या आंदोलनाचे १५ प्रतिनिधींनी भद्रकाली बेसवर सैन्य अधिकाऱ्यांना भेटले. या भेटीत देशात अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी काही नावांचा पर्याय त्यांनी सुचवला. ज्यात माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की, काठमांडूचे मेयर बालेंद्र शाह, माजी अध्यक्ष ओन्सारी घर्ती मगर, वकील ओम प्रकाश आर्याल, डॉ. गोविंद केसी, ब्रिगेडियर जनरल प्रेम शाही आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीलकंठ उप्रेती यांचा समावेश होता.
त्यातच सैन्याने व्यवसायी दुर्गा प्रसाई आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी यांना चर्चेत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव दिला, तेव्हा आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी रक्षा बम यांनी बैठक सोडली. प्रसाई हिंदू राजेशाहीचे समर्थन करतात आणि संघराज्यीय लोकशाही ढाचा संपवण्याची मागणी करतात. तर २०२२ मध्ये बनलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीवर काही युवा संघटनांनी सध्याच्या व्यवस्थेचा बचाव करत असल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही संघटनांना सहभागी केल्याने आंदोलन कमकुवत होईल असं रक्षा बम यांनी म्हटलं. सैन्य प्रमुखांनी दिलेला प्रस्ताव आम्ही फेटाळला आणि बैठकीतून बाहेर पडलो असं त्यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या सर्व गटामध्ये एकमत दिसून आले नाही.
अखेर सर्व सहमतीने माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव पुढे आले. मात्र त्यांना तयार करणे फार मोठे चॅलेंज होते. सैन्य प्रमुख कार्की यांना भेटण्यासाठी रात्री २ वाजता घरी पोहचले. अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी आपणच योग्य व्यक्ती आहात असं सैन्य प्रमुखांनी त्यांना सांगितले. १५ तासांच्या महाचर्चेनंतर Gen Z आंदोलनकर्त्यांच्या आग्रहास्तव त्या तयार झाल्या. काठमांडूचे मेयर बालेंद्र शाह ज्यांचे नाव अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून पुढे आले होते. त्यांनीही सुशीला कार्की यांच्या नावाला पाठिबा दिला.
दरम्यान, सुशीला कार्की यांचं नाव पुढे आल्यानंतर लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुशीला कार्की पंतप्रधान होऊ शकत नाहीत, कारण त्या आधीच वादात सापडल्या आहेत. नव्या पिढीचा एखादा नेता पंतप्रधान व्हावा. आमची पहिली पसंत बालेंद्र शाह आहेत असं काही लोकांचे म्हणणं आहे. आमचा देश एका संकटात अडकला आहे. एखाद्या व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे. पंतप्रधान कुणीही व्हावे पण त्यांनी देशहिताचे निर्णय घ्यावेत जेणेकरून नेपाळी लोकांचे भले होईल असंही काही नागरिक म्हणत आहेत. त्यात बालेंद्र शाह यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.