काठमांडू - नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून Gen Z आंदोलनामुळे राजकीय संकट उभे राहिले होते. त्यानंतर शुक्रवारी देशाला नवीन पंतप्रधान मिळाले. देशाच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम सरकारचं नेतृत्व सोपवण्यात आले. त्यासोबतच नेपाळमधील संसद भंग करण्यात आली. नेपाळचे राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी नवनियुक्त पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या शिफारशीनंतर संसद भंग केली. राष्ट्रपती कार्यालयाने नोटीस जारी करत १२ सप्टेंबर २०२५ च्या रात्री ११ वाजल्यापासून संसद भंग करण्याची घोषण केली.
निवडणुकीच्या तारखांची घोषणा
संसद भंग करण्यासोबतच नेपाळमध्ये निवडणुकांच्या तारखांचीही घोषणा करण्यात आली. राष्ट्रपतींनी नवीन संसद गठित करण्यासाठी २१ मार्च २०२६ तारीख निश्चित केली आहे. शुक्रवारी रात्री सुशीला कार्की यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. त्या अंतरिम सरकारचं नेतृत्व करणाऱ्या देशातील पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. या घडामोडीनंतर नेपाळमधील राजकीय अस्थिरता संपली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच झालेल्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना ९ सप्टेंबरला राजीनामा द्यावा लागला होता. कार्की यांना नेपाळच्या संविधानानुसार अनुच्छेद ८० प्रमाणे पदाची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपतींनी कार्की यांना शुभेच्छा दिल्या.
शपथविधी कार्यक्रमाला कोण होते?
नवीन पंतप्रधान शपथविधी कार्यक्रमाला नेपाळचे मुख्य न्यायाधीश, वरिष्ठ सरकारी अधिकारी, सुरक्षा प्रमुख आणि इतर मान्यवर होते. त्यात माजी पंतप्रधान बाबूराम भट्टरई हे एकमेव माजी पंतप्रधान या सोहळ्याला होते. केपी शर्मा ओली पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यापासून अज्ञातवासात गेले आहेत. मात्र पत्राच्या माध्यमातून केपी यांनी सैन्याने मला सुरक्षित स्थळी ठेवले आहे असं सांगितले.
दरम्यान, सुशीला कार्की यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर Gen Z आंदोलनातील युवकांनी राष्ट्रपती कार्यालयाबाहेर जल्लोष केला. नेपाळी सोशल मीडियावर कार्की यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा देणारे संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यात पहिल्या महिला पंतप्रधान यांना शुभेच्छा आणि जेन जी आंदोलनकर्त्यांना धन्यवाद देणारे मेसेजही आहेत. एका युवतीने तिच्या फेसबुक पेजवर पहिल्या महिला पंतप्रधान झाल्याचा आनंद व्यक्त करत हे माझे घर आहे, माझे कॉलेज आहे, आता माझा देश आईच्या प्रेमाने, त्यागाने आणि स्नेहाने चालेल असा विश्वास तिने व्यक्त केला.