Israel-Hamas War: इस्रायलचे ३.६० लाख सैनिक कोणत्याही गाझावर हल्ला करण्याच्या तयारीत असून, उत्तर गाझामधील तब्बल १० लाख लोकांना गाझा शहर सोडण्याचे आदेश इस्रायलच्या सैन्याने दिले आहेत. यातच गाझा शहरावर इस्रायलकडून जोरदार हल्ले केले जात आहेत. गाझा शहर उद्ध्वस्त झाले असून, रुग्णालयांमध्ये आता मृतदेह ठेवायलाही जागा उरलेली नाही, असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे, ही तर केवळ सुरुवात असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत १९०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७६९६ लोक जखमी झाले आहेत. इस्रायलमध्ये १३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींचा आकडा २८०० च्या पुढे गेला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी १२० इस्रायली लोकांना ओलीस ठेवले आहे. या युद्धामुळे गाझा पट्टीतील ४ लाख २३ हजार लोकांना घरे सोडावी लागली आहेत. ३२ हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात हमासची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त झाली आहेत. पण हमासचे हल्ले अजूनही थांबलेले नाहीत. हमासचे दहशतवादी दररोज इस्रायलच्या दिशेने शेकडो रॉकेट डागत आहेत.
ही तर केवळ सुरुवात आहे
इस्रायल गाझापट्टीत नरसंहार करत आहे. जगभरातून पाठिंबा मिळत असल्याने इस्रायल हे करू शकला, असे सांगत पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानांनी जागतिक स्तरावरील नेत्यांवर टीका केली आहे. इराण, लेबनॉन, सीरिया, तुर्कस्तान हे देश हमासच्या पाठीशी उभे आहेत. गाझा आणि इस्रायलमधील लोक विरोध आणि समर्थन यांच्यातील युद्धाचा सामना करत आहेत. तर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, आम्ही शत्रूवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला करत आहोत. ही फक्त सुरुवात आहे. शत्रूने नुकतीच किंमत चुकवायला सुरुवात केली आहे. माझी पूर्ण योजना उघड करणार नाही पण ही फक्त सुरुवात आहे हे निश्चित, असे नेतन्याहू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, गाझामध्ये नरसंहार होत आहे. पाणी आणि वीज खंडित झाली आहे. खासगी सरकारी इमारती मोडकळीस आल्या आहेत. इस्रायलने गाझा रिकामा करण्यास सांगितले आहे. हे १९५० पासून होत आहे. हे आम्हाला मान्य नाही, असे पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.