ब्राझीलमधील सर्वोच्च न्यायालयाने देशाचे माजी राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांना २७ वर्षे आणि ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. बोल्सोनारो यांना २०२२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्तांतर घडवून आणण्याचा कट रचल्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. ७० वर्षीय बोल्सोनारो यांना ५ आरोपांखाली दोषी ठरवण्यात आल्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे. कायद्यातील तरतुदींनुसार त्यांना कमाल ४३ वर्षांची शिक्षा होऊ शकली असती. मात्र कोर्टाने त्यांचं वय आणि आरोग्याचा विचार करून त्यांना होणाऱ्या शिक्षेत कपात केली.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी बोल्सोनारो यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा निषेध केल्यानंतर या घटनेची अधिक चर्चा होऊ लागली आहे. बोल्सोनारो हे एक उत्तम व्यक्ती आहेत असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निकाल ब्राझीलसाठी खूप वाईट असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय ब्राझीलमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लावण्याची धमकीही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही या निकालावर टीका केली आहे. या चुकीच्या निकालाविरोधात कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे आता ब्राझील आणि अमेरिकेतील आधीपासून तणावपूर्ण असलेले कूटनीतिक संबंध आणखी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, बोल्सोनारो यांच्या वकिलांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातील ११ सदस्यांच्या पूर्ण पीठाकडे अपील दाखल करण्याची घोषणा केली आहे. सध्या बोल्सेनारो हे नजरकैदेत असून, त्यांनी कुठलंही चुकीचं काम केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. तत्पूर्वी एका वेगळ्या प्रकरणात बोल्सेनारो यांना २०३० पर्यंत ब्राझीलमधील कुठल्याही सार्वजनिक पदासाठी निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली होती.