कोलंबो : अमली पदार्थांची तस्करी केल्याच्या आरोपावरुन श्रीलंकेत मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या पाच भारतीय मच्छीमारांची बुधवारी सुटका करण्यात आली. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी त्यांची शिक्षा माफ केली. तुरुंग अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार या पाचजणांना स्थलांतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. अध्यक्ष राजपक्षे यांनी त्यांना अध्यक्षीय माफी जाहीर केली आहे, असे अध्यक्षांचे प्रवक्ते मोहन समरनायके यांनी जाहीर केले. भारतीय उच्चायुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार या पाचजणांना भारतातही शिक्षा भोगावी लागणार नाही. त्यांच्या मुक्ततेची प्रक्रिया नक्की कशी असेल हे ठरविले जात आहे. नेपाळ येथे सार्क परिषदेला आठवड्यापेक्षाही कमी वेळ राहिला असून, या परिषदेत राजपक्षे व पंतप्रधान मोदी यांची भेट होणार आहे. त्याआधी या पाच मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे. इमर्सन, पी आॅगस्टस, आर विल्सन, के प्रसाथ, जे लँगलेट अशी या मच्छिमारांची नावे असून हे सर्वजण तामिळनाडूतील आहेत. त्याना २०११ मध्ये अटक झाली होती व कोलंबो उच्च न्यायालयाने ३० आॅक्टोबर रोजी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यांच्यावर अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप होता. (वृत्तसंस्था)
पाच भारतीयांची सुटका
By admin | Updated: November 20, 2014 01:42 IST