लंडन, ब्रसेल्स आणि बर्लिनसह युरोपमधील अनेक प्रमुख विमानतळांवर एकाच वेळी झालेल्या सायबर हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. या हल्ल्यामुळे विमानतळांवरील चेक-इन आणि बोर्डिंग प्रणाली पूर्णपणे ठप्प झाली आहे. ज्यामुळे शेकडो उड्डाणे रद्द झाली आहेत किंवा त्यांना उशीर झाला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी विमानतळांवर उसळली आहे.
या सायबर हल्ल्यात कॉलिन्स एरोस्पेस या कंपनीला लक्ष्य करण्यात आले होते. ही कंपनी जगभरातील अनेक विमान कंपन्यांना चेक-इन आणि बोर्डिंगसाठीचे सॉफ्टवेअर पुरवते. कंपनीच्या माहितीनुसार, सॉफ्टवेअरमध्ये 'सायबर-संबंधित बिघाड' झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक चेक-इन आणि बॅगेज ड्रॉप-ऑफ सेवा बंद पडल्या आहेत. कंपनीने तातडीने मॅन्युअल ऑपरेशन सुरू केले असून, दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हा सायबर हल्ला शुक्रवारी रात्री (१९ सप्टेंबर) सुरू झाला आणि शनिवारी सकाळपर्यंत सर्वत्र पसरला आहे.
या घटनेनंतर, लंडनच्या हीथ्रो, ब्रसेल्स आणि बर्लिन विमानतळांच्या प्रशासनाने प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. सर्व चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया हाताने सुरू असल्यामुळे वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे.
Air India नेही दिली सूचना
या हल्ल्यामुळे एअर इंडियानेही आपल्या प्रवाशांना सूचना जारी केली आहे. हीथ्रो विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेक-इन प्रक्रियेत विलंब होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी वेब चेक-इन करूनच विमानतळावर पोहोचावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
ही घटना विमानतळांवरील सायबर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत आहे, असे सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे. भविष्यात असे हल्ले टाळण्यासाठी युरोपीय नियामक या घटनेचे पुनरावलोकन करतील अशी अपेक्षा आहे.