वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन या परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी ईमेलसाठी खासगी सर्व्हर वापरल्याच्या प्रकरणाची एफबीआयने चौकशी पुन्हा सुरू केल्याचा निर्णय ‘अभूतपूर्व’ आणि ‘खूपच त्रासदायक’ असल्याची प्रतिक्रिया स्वत: क्लिंटन यांनी रविवारी व्यक्त केली. निवडणूक अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक जेम्स कॉमी यांनी नुकत्याच शोध लागलेल्या ईमेल्सबाबत नव्याने सुरू केलेल्या चौकशीची संपूर्ण वस्तुस्थिती समोर मांडावी, असा आग्रह हिलरी क्लिंटन आणि त्यांच्या प्रचार मोहिमेच्या प्रमुखांनी केला आहे. हा वाद क्लिंटन यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:च्या फायद्यासाठी करून घेणार. निवडणुकीच्या अगदी तोंडावर छोट्याशा माहितीवर आधारीत काही तरी समोर मांडणे हे खूपच विचित्र आहे. हे विचित्रच नसून अभूतपूर्वही आहे, असे क्लिंटन यांनी फ्लोरिडातील आपल्या पाठिराख्यांच्या मेळाव्यात म्हटले. मतदारांना सगळी आणि परिपूर्ण माहिती मिळणे आवश्यक असताना तर असे होणे खूपच त्रासदायक असल्याचे त्या म्हणाल्या. कॉमी यांनी सगळी माहिती समोर मांडावी, असे आवाहन क्लिंटन यांनी केले. अमेरिकेच्या मतदारांना ट्रम्प संभ्रमात टाकण्याचा, त्यांची दिशाभूल करण्याचा व त्यांचा उत्साह मारून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. ट्रम्प यांनी कोलोरॅडो येथील मेळाव्यात न्याय विभाग क्लिंटन यांना पाठिशी घातल असल्याचा आरोप केला होता. (वृत्तसंस्था)
‘ई-मेल्स प्रकरणाची पुन्हा चौकशी त्रासदायक’
By admin | Updated: October 31, 2016 07:33 IST