जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आनंदाला सध्या उधाण आले आहे. ज्या नोबेल शांतता पुरस्काराची ते अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होते, त्या पुरस्काराचे मेडल अखेर त्यांच्या हाती पडले आहे. वेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आणि नोबेल विजेत्या मारिया कोरीना माचाडो यांनी नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली आणि आपले पदक त्यांना भेट म्हणून दिले.
काय घडलं व्हाईट हाऊसमध्ये?
गेल्या काही काळापासून वेनेझुएलाच्या राजकारणावरून ट्रम्प आणि माचाडो यांच्यात काहीसे थंड संबंध असल्याचे बोलले जात होते. मात्र, व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माचाडो यांनी हे पदक ट्रम्प यांना सुपूर्द केल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. आपल्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी लिहिले की, "मारिया माचाडो यांनी मला त्यांच्या नोबेल शांतता पुरस्काराचे पदक दिले, हा माझा मोठा सन्मान आहे. त्या अत्यंत धाडसी महिला आहेत आणि त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे."
हा केवळ 'प्रतीकात्मक' सन्मान?
माचाडो यांनी ट्रम्प यांना मेडल दिले असले तरी तांत्रिकदृष्ट्या ट्रम्प 'नोबेल विजेते' ठरणार नाहीत. नोबेल संस्थेने यावर स्पष्टीकरण दिले आहे की, कोणताही नोबेल विजेता आपले पदक दुसऱ्या कोणालाही अधिकृतपणे हस्तांतरित करू शकत नाही. त्यामुळे, माचाडो यांनी दिलेले हे पदक केवळ एक प्रतीकात्मक भेट मानली जात आहे. असे असले तरी, ट्रम्प हे पदक स्वतःकडे ठेवू शकतात, असे व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
माचाडो यांचा राजकीय मास्टरस्ट्रोक
वेनेझुएलामध्ये सध्या लोकशाहीसाठी मोठा संघर्ष सुरू आहे. २०२४ च्या निवडणुकीत माचाडो यांच्या पक्षाचा विजय झाला असल्याचा दावा केला जातो, मात्र निकोलस मादुरो यांनी सत्ता सोडण्यास नकार दिला आहे. अलीकडच्या काळात ट्रम्प यांनी मादुरो यांच्या जवळच्या व्यक्तींसोबत काम करण्याचे संकेत दिल्याने माचाडो काहीशा बाजूला पडल्या होत्या. अशा परिस्थितीत ट्रम्प यांना नोबेल मेडल देऊन त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचा भक्कम पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
११ महिन्यांच्या अज्ञातवासानंतर माचाडो प्रकटल्या
मारिया माचाडो या गेल्या ११ महिन्यांपासून व्हेनेझुएलामध्ये लपून राहत होत्या. नॉर्वेमध्ये जेव्हा त्यांना नोबेल जाहीर झाले, तेव्हाही त्या तिथे जाऊ शकल्या नव्हत्या; त्यांच्या मुलीने तो पुरस्कार स्वीकारला होता. आता थेट वॉशिंग्टनमध्ये प्रकटून आणि ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांनी जगाला मोठा संदेश दिला आहे. "आम्ही अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतो," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Web Summary : Trump received a Nobel Peace Prize medal from Venezuelan opposition leader Maria Machado. While symbolic, it's seen as Machado seeking renewed US support amid Venezuela's political turmoil and her struggle against Maduro's regime. Trump praised Machado's courage.
Web Summary : ट्रम्प को वेनेजुएला की विपक्षी नेता मारिया माचाडो से नोबेल शांति पुरस्कार पदक मिला। यह प्रतीकात्मक है, लेकिन इसे माचाडो द्वारा वेनेजुएला की राजनीतिक उथल-पुथल और मादुरो शासन के खिलाफ संघर्ष के बीच अमेरिकी समर्थन पाने की कोशिश के रूप में देखा जा रहा है। ट्रम्प ने माचाडो के साहस की प्रशंसा की।