डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि कंझर्वेटिव्ह यूथ ग्रुप टर्निंग पॉईंट यूएसएचे सीईओ आणि सहसंस्थापक चार्ली कर्क यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी युटा व्हॅली विद्यापीठामध्ये एका चर्चासत्रादरम्यान, चार्ली कर्क यांच्यावर शेकडो लोकांसमोर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतच सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. तसेच चार्ली कर्क यांच्या सन्मानार्थ देशाचे राष्ट्रध्वज अर्ध्यावर झुकवण्याची सूचना दिली आहे.
टर्निंग पॉईंटकडून आयोजित एका चर्चासत्रामध्ये संबोधित करत असताना चार्ली कर्क यांच्यावर गोळीबार करण्यात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कर्क यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना चिंताजनक अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या गोळीबार प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र त्याची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, कर्क हे विद्यापीठात आले असताना त्यांना काही लोकांनी विरोधही केल्याची माहिती समोर येत आहे. विद्यापीठामधील त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करणाऱ्या ऑनलाइन याचिकेवर सुमारे १ हजार लोकांनी सह्या करून ती विद्यापीठ प्रशासनाला दिली होती. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संवादाच्या स्वातंत्राशी संबंधित असल्याने हा कार्यक्रम रद्द केला जाणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले होते.
चार्ली यांच्या मृत्यूची माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, खऱ्या अर्थाने महान असलेले चार्ली कर्क आता या जगात नाहीत. अमेरिकन तरुणाईचं मन त्यांच्या एवढं कुणालाच समजलं नाही. तसेच चार्ली यांच्याकडे असलेल्या मनासारखं मनही कुणाकडे नव्हतं. माझ्यासह प्रत्येकजण त्यांच्यावर प्रेम करायचा. आता ते या जगात नाहीत. मेलानिया आणि मी त्यांची प्रिय पत्नी एरिका आणि संपूर्ण परिवाराबाबत संवेदना व्यक्त करतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.