पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर आहेत, अशावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने आता आपणहूनच अमेरिकेवरील टेरीफ कमी करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे म्हटले आहे. हे त्यांनी खूप वर्षांपूर्वीच करायला हवे होते, असे ट्रम्प म्हणाले आहेत.
ट्रम्प यांनी सोमवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर भारतासोबतच्या व्यापारी संबंधांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. अमेरिका भारताला खूप कमी वस्तू विकतो, हे खूप कमी लोकांना माहिती असेल. भारत अमेरिकेला भरपूर वस्तू विकतो. परंतू, तरीही भारताचे टेरिफ जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक आहे. यामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतात व्यवसाय करणे कठीण जात आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी करतो, परंतू अमेरिकेकडून खूप कमी खरेदी केली जाते, असे ट्रम्प म्हणाले.
भारताने आता अमेरिकन आयातीवरील कर कमीत कमी करण्याची ऑफर दिली आहे, पण त्यांनी हे खूप उशिरा उचललेले पाऊल आहे. भारताने हे पाऊल वर्षांपूर्वीच उचलायला हवे होते, असे ते म्हणाले.
ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर ५०% कर लादला आहे. यामध्ये २५% बेसलाइन टॅरिफ आणि रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल शिक्षा म्हणून २५% अतिरिक्त टॅरिफ लादले आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करत राहील, असे स्पष्टपणे सांगितलेले आहे.