न्यूयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्यावर परदेशी विद्यार्थ्यांवर बंदी घातली होती. मात्र कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने ट्रम्प यांचे मनसुबे उधळले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता ट्रम्प प्रशासनाने रद्द केल्याने विद्यापीठात कायदेशीर प्रवेश घेतलेल्या ८०० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांसह हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता. चीनसह अनेक देशांनी व जगभरातील विद्यार्थ्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. दुसरीकडे हार्वर्ड विद्यापीठाने ट्रम्प सरकारच्या या निर्णयाविरोधात बोस्टनच्या न्यायालयात धाव घेतली होती.
विद्यापीठासोबतचा कलगीतुरा व नंतरच्या घडामोडींनंतर ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने गुरुवारी विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शैक्षणिक देवाण-घेवाण प्रवेश कार्यक्रम प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे भविष्यात हार्वर्ड विद्यापीठ परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नव्हते. या निर्णयामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कायदेशीर दर्जा रद्द झाला होता. त्यामुळे येथे सध्या शिक्षण घेत असलेल्या भारतीय व इतर देशांच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ सोडावे लागणार होते. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांत हार्वर्ड विद्यापीठाच्या विविध विभागांत ७८८ विद्यार्थी व संशोधन करत आहेत. प्रत्येक वर्षी या विद्यापीठात ५०० ते ८०० विद्यार्थी व संशोधक शिक्षण आहेत.
सूड उगवण्याचा प्रयत्न
ट्रम्प प्रशासनाने मागितलेली माहिती राजकीय प्रकारची असून हा घटनाबाह्य मार्गाने सूड उगवण्याचा प्रकार असल्याचा दावा हार्वर्ड विद्यापीठाने केला आहे. या निर्णयाचा हजारो विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होणार होता.
भारतीय विद्यार्थ्यांना देश सोडावा लागला असता
ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना एक तर देश सोडावा लागला असता किंवा इतर विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यास प्रयत्न करावा लागला असता.
परदेशी विद्यार्थ्यांशिवाय हार्वर्ड, हार्वर्ड नाही
हार्वर्डचे अध्यक्ष एलन गार्बर यांनी स्पष्ट केले की, परदेशी विद्यार्थ्यांशिवाय हार्वर्ड, हार्वर्ड नाही. विद्यापीठ आपले मूलभूत आणि कायद्याने संरक्षित मूल्य सोडणार नाही.
१०,००० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
ट्रम्प प्रशासनाने एसईव्हीपी प्रमाणपत्र रद्द केल्याने विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या व संशोधन करणाऱ्या १०,१५८ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले होते.
हार्वर्डची स्वप्ने आली धोक्यात
ट्रम्प सरकारने हार्वर्डला परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापासून रोखल्याने भारतीय विद्यार्थ्यांचे हार्वर्डमध्ये शिकण्याचे स्वप्न संकटात आले होते.
ट्रम्प प्रशासनाकडून ७२ तासांचा वेळ
दर्जा पुन्हा मिळवायचा असेल तर मागितलेली पाच वर्षांतील सर्व माहिती ७२ तासांत उपलब्ध करून देण्याचे आदेश विद्यापीठाला दिले होते. विद्यापीठातील मोर्चे, आंदोलनासोबतच उपलब्ध ऑडिओ व व्हिडिओ फुटेज मागण्यात आले होते.
एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थी (२०२४-२५): १०,१५८
भारतीय विद्यार्थी (प्रत्येक वर्षातील संख्या):
२०१८-१९ ६२४२०१९-२० ६५९२०२०-२१ ५१३२०२१-२२ ६१३२०२२-२३ ८१६२०२३-२४ ८२४२०२४-२५ ७८८