Donald Trump Liberia English Comment: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांनी लायबेरिया देशाचे अध्यक्ष जोसेफ बोआकाई यांचे इंग्लिश बोलण्यावरुन कौतुक केले. मात्र, आता यावरुन आफ्रिकन देशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ट्रम्प यांनी आमच्या देशाच्या प्रमुखांचा अपमान केल्याचे लायबेरियन नागरिकांचे म्हणने आहे. या संदर्भातील एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय.
सविस्तर माहिती अशी की, १० जुलै २०२५ रोजी व्हाईट हाऊसमध्ये ५ पश्चिम आफ्रिकन नेत्यांसोबत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी लायबेरियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बोआकाई यांच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीचे कौतुक केले. ते म्हणाले, "तुम्ही किती चांगले आणि सुंदर इंग्रजी बोलता. तुम्ही इतके चांगले इंग्रजी बोलायला कुठे शिकलात? तुमचे शिक्षण कुठे झाले आहे?" असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांच्या या टिप्पणीमुळे लायबेरियासह संपूर्ण आफ्रिकन खंडात संताप व्यक्त होतोय. ट्रम्प यांनी जाणीवपूर्वक ही टिप्पणी केल्याचे लायबेरियन नागरिकांचे म्हणने आहे. देशातील विरोधी पक्ष काँग्रेस फॉर डेमोक्रॅटिक चेंज-कौन्सिल ऑफ पॅट्रियट्सचे अध्यक्ष फोडे मसाक्वॉई यांनी याला अपमानास्पद म्हटले. ते म्हणाले की, ट्रम्प यांच्या टिप्पणीवरुन हे सिद्ध होते की, पाश्चिमात्य देश आम्हाला गांभीर्याने घेत नाहीत. ट्रम्प यांनी आमच्या नेत्याशी खूप अनादरपूर्ण वर्तन केले. अनेकांनी तर याला वसाहतवादी मानसिकतेचे उदाहरण म्हटले आहे.
लायबेरिया आणि अमेरिकेतील ऐतिहासिक संबंधलायबेरिया आणि अमेरिकेतील संबंध ऐतिहासिकदृष्ट्या खोल आहेत. अमेरिकेतून आफ्रिकेत आणलेल्या गुलामांच्या मदतीने लायबेरियाची स्थापना झाली होती. आजही, लायबेरियाची राजकीय व्यवस्था अमेरिकेच्या धर्तीवर आधारित आहे. तेथील रस्ते, टॅक्सी आणि स्कूल बसेसची रचना अमेरिकेप्रमाणे आहे. विशेष म्हणजे, इंग्रजी ही लायबेरियाची अधिकृत भाषा आहे. यामुळेच ट्रम्प यांच्या टिप्पणीमुळे लायबेरियातील नागरिकांमध्ये अपमानित झाल्याची भावना आहे.
काही तज्ञांनी तर या घटनेचा संबंध ट्रम्पच्या वैयक्तिक शैली आणि राजनैतिक दृष्टिकोनाशी जोडला. आफ्रिकन मेथोडिस्ट एपिस्कोपल युनिव्हर्सिटीचे संशोधन संचालक अब्राहम ज्युलियन वेन्ना म्हणाले की, काही लोकांसाठी ही टिप्पणी नम्रतेचे प्रतिबिंब असू शकते, परंतु ती वसाहतोत्तर संदर्भात भाषेचा शस्त्र म्हणून वापर करण्याची आठवण करून देते.