न्यूयॉर्क : भारत व पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली असा दावा त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. या दोन देशांमध्ये जे घडत होते ते मला फारसे आवडले नव्हते. त्यामुळे त्यांची समजूत काढून त्यांना शांतता प्रस्थापित करण्याची मी राजी केले असेही त्यांनी सांगितले. गेल्या शनिवारपासून पाचव्यांदा त्यांनी हा दावा केला आहे.
ते म्हणाले की, संभाव्य अणुयुद्धाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना अभूतपूर्व आहे. भारत व पाक हे दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत. जर अणुयुद्ध झाले तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम होतील. लाखो लोकांचा मृत्यूची भीती होती. त्यामुळेच अमेरिकेने युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
अमेरिकन पप्पांनी युद्ध थांबवले का? : काँग्रेस
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकमध्ये ‘मध्यस्थी’ केल्याचा दावा केल्यानंतर काँग्रेसने “अमेरिकन पप्पांनी युद्ध थांबवले का?” असा प्रश्न विचारत म्हटले की, इतर वेळेला अतिशय स्पष्टपणे बोलणारे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांना या खुलाशाबद्दल काय म्हणायचे आहे? त्यांनी अमेरिकन दबावासमोर भारताचे सुरक्षा हितसंबंध गहाण ठेवले का?”
शस्त्रसंधीमुळे परिस्थिती अधिक सुधारली : संयुक्त राष्ट्र
भारत व पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यामुळे आता परिस्थिती अधिक सुधारली आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी सांगितले. आता दोन्ही देश उर्वरित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
भारत व पाकमधील शस्त्रसंधी हा संघर्ष संपविण्याच्या प्रक्रियेतील सकारात्मक टप्पा आहे. त्यामुळे प्रस्थापित झालेल्या शांततेमुळे दोन्ही देशांना इतर मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)