वॉशिंग्टन : मानवी बोलण्याची सही सही नक्कल करणारे पोपट हे महान नकलाकार असून, त्यांना ही देणगी कशी मिळाली याचा शोध संशोधकांनी लावला असून त्यात मूळ भारतीय संशोधक आघाडीवर आहेत. पोपटाचा मेंदू कसा असतो व तो मानवाच्या बोलण्याची नक्कल कशी सादर करतो याचे संशोधन करण्यात आले आहे.ड्यूक विद्यापीठाच्या सहाय्यक मुक्ता चक्रवर्ती यांनी हे संशोधन केले असून, या शोधामुळे पोपटांच्या संशोधनाला मोठा वाव मिळेल असे मुक्ता यांनी म्हटले आहे. या संशोधनामुळे मानवी मेंदूतील बोलण्याच्या प्रक्रियेवरही प्रकाश पडणार आहे. पोपट हे भाषा शिकू शकणाऱ्या अगदी कमी पक्ष्यापैकी एक आहेत. ते मानवी बोलण्याची नक्कल सादर करतात. पोपटांच्या मेंदूची रचना गीत गाणाऱ्या व हमिंग आवाज करणाऱ्या पक्ष्यांपेक्षा वेगळी असते. पोपटांच्या मेंदूत बोलणे शिकण्याचे केंद्र असते, त्याला कोअर म्हणतात. याखेरीज मेंदूच्या बाहेरच्या भागात शेल्स नावाच्या रिंग असतात. या रिंग पोपटाला बोलण्याची क्षमता देतात. पोपटांच्या विविध जातीत या रिंग मोठ्या असतात व पोपटाला मानवाच्या बोलण्याची सही सही नक्कल करण्याची क्षमता देतात. (वृत्तसंस्था)
पोपटपंचीचे वैज्ञानिक रहस्याचा झाला उलगडा
By admin | Updated: June 26, 2015 00:05 IST