बांगलादेशची राजधानी ढाका येथून पाकिस्तानचे राजदूत सय्यद मारुफ बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात आता एक मोठा खुलासा झाला आहे. ११ मे रोजी मारुफ जीन्स आणि टी-शर्टमध्येच ढाकाहून इस्लामाबादला रवाना झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर सय्यद मारुफ हनी ट्रॅपमध्ये अडकले अशी चर्चा संपूर्ण बांगलादेशात रंगली आहे. नॉर्थ-ईस्ट पोस्टने सूत्रांचा हवाला देत दावा केला आहे की, मारुफ यांचे बांगलादेशातील एका २३ वर्षीय बँक कर्मचारी तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या नात्यात असा ट्वीस्ट आला की, मारुफ यांना घाईघाईने बांगलादेशातून पळ काढावा लागला. मारुफ पाकिस्तानला परतल्याने दोन्ही देशांमधील संबंधांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
जय मुलीमुळे या गोष्टी घडल्या, ती मुलगी ढाका येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. ही २३ वर्षांची मुलगी बांगलादेश बँकेत काम करते. या मुलीचे आडनाव हक आहे. इतकंच नाही तर, या मुलीचे आणि मारुफ यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हक इंस्टाग्रामवर फक्त मारुफ यांना फॉलो करत आहे. तिच्या प्रोफाइलमध्ये तिने स्वतःला एका बँकेची सहाय्यक संचालक असल्याचे म्हटले आहे. मारुफ बांगलादेशातून बेपत्ता झाल्यानंतर, या २३ वर्षीय मुलीचे अकाऊंट सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
आधीही राजदूत अडकले हनी ट्रॅपमध्ये!गेल्या महिन्यात, बांगलादेशमध्ये सौदीचे माजी राजदूत हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. या प्रकरणात बांगलादेश पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईचा एक भाग म्हणून, राजदूताशी संबंध असलेल्या मॉडेल मेघनाला पोलिसांनी अटक केली होती. या संपूर्ण कारवाईदरम्यान सौदी राजदूताला आपल्या देशात परतावे लागले होते. त्यावेळी बांगलादेश सरकारने सौदी अरेबियाशी असलेल्या संबंधांबद्दल चिंता व्यक्त केली होती.
पाकिस्तान आणि बांगलादेशमधील संबंधांवर संकट२०२३च्या अखेरीस, सय्यद मारुफ यांना पाकिस्तानने बांगलादेशला पाठवले होते. ऑगस्ट २०२४मध्ये मारुफ राजदूत म्हणून काम करू लागले. याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तानचे बांगलादेशच्या कट्टरपंथी सरकारशी संबंध सुधारले. या वर्षी, १९७१ नंतर पहिल्यांदाच, बांगलादेशने पाकिस्तानमधून तांदूळ आयात केला होता. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये व्यापाराबाबत एक करार होणार होता. मात्र, आता ज्या पद्धतीने मारुफ यांना ढाक्याहून परतावे लागले, त्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांवर आता चिंता व्यक्त केली जात आहे.