कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. सध्या परिस्थिती पूर्वीसारखी गंभीर नाही, परंतु काही देशांमध्ये अचानक वाढलेल्या प्रकरणांमुळे निश्चितच चिंता निर्माण झाली आहे. यावेळी सर्वाधिक रुग्ण ब्रिटनमध्ये दिसून येत आहेत, जिथे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या फक्त एका आठवड्यात जवळजवळ दुप्पट झाली आहे.
आकडेवारीनुसार, २ मे रोजी संपलेल्या आठवड्यात कोरोनामुळे १०१ लोकांचा मृत्यू झाला असं त्यांच्या डेथ सर्टिफिकेटमध्ये म्हटलं आहे. गेल्या आठवड्यापेक्षा ही संख्या ६५% जास्त आहे. जानेवारीच्या सुरुवातीला एका आठवड्यात १११ मृत्यूची नोंद झाली होती. जरी हे आकडे नोव्हेंबर २०२३ मध्ये आलेल्या २७३ आठवड्यांच्या मृत्यूंपेक्षा कमी असली तरी अचानक झालेली ही वाढ चिंताजनक आहे.
धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
JN.1 व्हेरिएंटचा वेगाने प्रसार
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट JN.1 या वाढीस जबाबदार आहे. हा व्हेरिएंट जगाच्या अनेक भागात पसरला आहे आणि जागतिक स्तरावर एक प्रमुख स्ट्रेन बनला आहे. हेच कारण आहे की, अनेक देशांमध्ये संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढत आहे. केवळ ब्रिटनमध्येच नाही तर अनेक आशियाई देशांमध्येही कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. याशिवाय सिंगापूरमध्ये ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात कोरोना संसर्गाची प्रकरणं ११,१०० वरून १४,२०० वर पोहोचली आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची सरासरी संख्याही १०२ वरून १३३ वर पोहोचली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट
थायलंडमध्ये १७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होऊन ३३,००० पेक्षा जास्त झाली आहे. सरकारने नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. १० मे रोजी संपलेल्या आठवड्यात हाँगकाँगमध्ये १,०४२ प्रकरणे नोंदली गेली, जी मागील आठवड्यात ९७२ प्रकरणांपेक्षा जास्त आहे. तेथील आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत, एक एप्रिल ते जुलै २०२३ आणि दुसरी फेब्रुवारी ते मार्च २०२४. आता एप्रिल २०२५ च्या मध्यापासून संसर्ग पुन्हा होत असल्याचं दिसतं.
कोरोना रिटर्न्स! 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, पाहा कुणाला सर्वाधिक धोका
धोका किती मोठा?
कोरोनाचं हे पुनरागमन पूर्वीइतकं गंभीर नाही, परंतु व्हायरस नवीन स्वरूप आणि वेगाने वाढणारे रुग्ण हे सूचित करत आहेत की सतर्क राहणं महत्त्वाचं आहे. आरोग्य संस्था सतत लक्ष ठेवून आहेत आणि लोकांना आवश्यकतेनुसार मास्क घालणं, हात धुणं आणि गर्दी टाळणं यासारखी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. ब्रिटनमधील मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ आणि आशियातील वाढत्या रुग्णसंख्येवरून असं दिसून येतं की सतर्क राहण्याची गरज आहे.