कोलंबो : श्रीलंकेमध्ये 21 एप्रिलला चर्च आणि हॉटेलांबाहेर झालेल्या 8 साखळी बॉम्बस्फोटांचे पडसाद आता उमटू लागले आहेत. तेथील नेगोंबोमध्ये स्थानिक सिंहली आणि मुस्लिमांदरम्यान दंगल भडकली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर सुमित अटापट्टू यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्फ्यु लावला आहे. रविवारी ही घटना घडली. अफवांना रोखण्यासाठी सोशलमीडिया साईटवर बंदी आणण्यात आली आहे.
श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये नेगोंबोतील एका चर्चचाही समावेश होता. मात्र, गेल्या 15 दिवसांमध्ये दोन समुदायांमध्ये झालेला हा पहिला प्रकार होता. रविवारी अधिकारी शहरातील शाळा पुन्हा सुरु करण्याच्या तयारीत असताना दंगल उसळली. समाजकंटकांनी मोटारसायकल, कारच्या काचा फोडल्या. या भागावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने विशेष सुरक्षा दलाला पाचारण केले असून पोलीस तपास करत आहेत.