Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. गेल्या चार दिवसांपासून भारताच्या पश्चिम सीमेवरील अनेक भागांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच होते. परंतु, शनिवारी दुपारी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्धविराम लागू झाला होता. या युद्धविरामाला काही तासच उलटले असताना पाकिस्ताने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यावरून भारताकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली. या घडामोडी सुरू असतानाच चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी संवाद साधला. या संवादावेळी अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना भारताची भूमिका स्पष्टपणे सांगितली.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, अजित डोवाल यांनी म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे भारताने दहशतवादविरोधी कारवाई करणे आवश्यक आहे. युद्ध हा पर्याय भारतासमोर नव्हता आणि तो कोणत्याही पक्षाच्या हिताचा नाही. भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीसाठी वचनबद्ध असतील. शक्य तितक्या लवकर शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असतील.
चीनकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध
यावर वांग यी म्हणाले की, चीन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशांत आहे. आशियातील शांतता आणि स्थैर्य कष्टाने मिळवले आहे. ती जपली पाहिजे. भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत, जे एकमेकांपासून दूर होऊ शकत नाही आणि हे दोन्ही देश चीनचेही शेजारी आहेत. युद्ध हा भारतासमोरचा पर्याय नाही, या तुमच्या भूमिकेचे चीन समर्थन करतो. भारत आणि पाकिस्तान शांत आणि संयमी राहतील, संवाद आणि सल्लामसलतीद्वारे मतभेद योग्यरित्या हाताळतील आणि परिस्थिती आणखी चिघळू नये, अशी प्रामाणिक आशा करतो. भारत आणि पाकिस्तानने सल्लामसलतीद्वारे व्यापक आणि कायमस्वरूपी युद्धबंदी साध्य करावी अशी चीन अपेक्षा करतो. हे भारत आणि पाकिस्तानच्या हिताचे आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचीही हीच इच्छा आहे.
दरम्यान, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे वृत्त आल्यानंतर घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये झालेल्या चर्चेनंतर युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मागच्या काही तासांपासून या युद्धबंदीचं घोर उल्लंघन पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. भारतीय लष्कर प्रत्युत्तरदाखल कारवाई करत आहे. तसेच या अतिक्रमणाला प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत निंदनीय आहे. तसेच पाकिस्तान यासाठी जबाबदार आहे. पाकिस्तानने या परिस्थितीचा व्यवस्थित विचार करावा आणि आगळीक थांबवावी, हे अतिक्रमण रोखण्यासाठी त्वरित योग्य ती कारवाई करावी, असे आम्ही आवाहन करत आहोत.