दावोस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये उपस्थित राहण्यासाठी रविवारी झुरिच, स्वित्झर्लंड येथे आगमन झाले. हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झर्लंड संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान व्यक्त करत, स्थानिक मराठी मंडळींनी पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी, झुरिचमधील लहान मुलांनी मराठी गौरवगीत सादर करत ‘पुन्हा येण्या’ची भावना अधोरेखित केली. वेदांत, हृषिकेश, रश्मी आणि अद्विका या चिमुकल्या दोस्तांनी निरागस शुभेच्छा दिल्या. या स्वागत समारंभाला भारतीय राजदूत मृदुलकुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह उपस्थित होते. सकाळी ६ वाजता झालेल्या या कार्यक्रमासाठी विविध भागांतून मराठी बांधव उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उत्स्फूर्त स्वागताबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, या स्वागताने मला घरच्याप्रमाणे वाटले. महाराष्ट्राच्या ऊर्जेची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावना येथे अनुभवली.