काँगोच्या गोमा शहरावर बंडखोरांनी कब्जा केला असून प्रचंड गोळीबार सुरु आहे. यात संयुक्त राष्ट्रांच्या मदतीला गेलेले भारतीय सैन्याचे मेडिकल कोअरचे ८० सैनिक आणि अधिकारी अडकले आहेत. या बंडखोरांनी शांती सेनेच्या थ्री फिल्ड हॉस्पिटलच्या परिसरालाही घेरल्याचे सांगितले जात आहे. यामुळे या जवानांचा जीव धोक्यात आला आहे.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) मध्ये विद्रोहींनी उत्पात सुरु केला आहे. M23 या बंडखोरांना शेजारील देश रवांडाचा पाठिंबा आहे. या बंडखोरांनी भारतीय सैनिक मदत करत असलेल्या हॉस्पिटलच्या कॅम्पला घेरले असून या कॅम्पमध्ये गोळीबार आणि आरपीजी हल्ल्याचा आवाज येत असल्याचे वृत्त आहे.
भारतीय लष्कराच्या वैद्यकीय दलाचे ८० सैनिक आणि अधिकारी शांती सेनेत सेवा करत आहेत. हे सर्वजण याच हॉस्पिटलला आहेत. अमेरिकेने रवांडाला याबाबतची माहिती दिली आहे. या बंडखोरांनी २० लाख लोकसंख्येचे शहर अवघ्या दोन दिवसांत कब्जामध्ये घेतले आहे. शहर ताब्यात घेताना झालेल्या चकमकीत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर मृतदेह दिसत होते. तर हॉस्पिटलमध्ये देखील जखमींची संख्या वाढलेली होती.
बंडखोरांनी शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा केला आहे. यामुळे विस्थापितांना मदत पोहोचविणे कठीण होऊन बसले आहे. एम २३ च्या कचाट्यातून शांती सेनेच्या सैन्याला वाचविण्यासाठी अमेरिकेने रवांडाला मध्यस्थी करण्यास सांगितले आहे. रवांडाचा त्यांना पाठिंबा असल्याने एम२३ पासून त्यांचा बचाव करता येईल असे अमेरिकेला वाटत आहे. एकंदरीतच परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे.
कांगोमध्ये गेल्या दशकभरापासून हा संघर्ष सुरु आहे. परंतू गेल्या काही दिवसांत यात अचानक वाढा झाल्याने अमेरिकाही त्रस्त झाली आहे. काँगो आणि रवांडा हे सदस्य असलेल्या आफ्रिकन संघटनेने रवांडाने एम२३ ना तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच आज सायंकाळी आपत्कालीन शिखर परिषदेचेही आयोजन केले आहे.
M23 म्हणजे कोण? तुत्सी जमातीचे लोक हे या एम२३ चे नेतृत्व करत आहेत. रवांडातील नरसंहारानंतर ३० वर्षांपूर्वी हा बंडखोर गट तयार झाला होता. हुतू अतिरेक्यांनी तुत्सी आणि उदारवादी हुतूंना मारले होते. यानंतर M23 ची स्थापना झाली आणि त्यांनी हुतू अतिरेक्यांना रवांडाबाहेर हाकलले होते.