बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सध्या एका महिला उमेदवाराच्या संघर्षाची कहाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राजशाही-३ या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारी हबीबा बेगम आज कुणा मोठ्या ताफ्यामुळे नाही, तर त्यांच्या साध्या आणि तितक्याच खडतर प्रचारशैलीमुळे चर्चेत आहे. कडेवर तान्हे बाळ घेऊन आणि ई-रिक्षाने गाव-गाव फिरून मतं मागणारी हबीबा ही आज सामान्य जनतेच्या आवाजाचे प्रतीक बनली आहे.
७ वेळा तुरुंगवास, पण जिद्द कायम!
हबीबा बेगम यांचा राजकीय प्रवास सोपा नव्हता. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात त्यांच्यावर सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्यांना सात वेळा तुरुंगात जावे लागले. वयाच्या २३ व्या वर्षी त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. मात्र, अनेक संकटे झेलूनही त्यांनी जनसेवेचा मार्ग सोडला नाही. एकेकाळी मोहोनपूर उपजिल्हा कृषक लीगच्या सचिव राहिलेल्या हबीबा यांनी आता कोणाच्याही पाठिंब्याशिवाय 'अपक्ष' म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
हायकोर्टापर्यंत लढा आणि फुटबॉल चिन्ह!
हबीबा यांचा उमेदवारी अर्ज सुरुवातीला रद्द करण्यात आला होता. प्राधिकरणानेही त्यांना नकार दिला, पण हार न मानता त्यांनी हायकोर्टाचे दार ठोठावले. २७ जानेवारीच्या रात्री त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आणि त्यांना 'फुटबॉल' हे निवडणूक चिन्ह मिळाले. राजशाही जिल्ह्यातून निवडणूक लढवणाऱ्या त्या एकमेव महिला उमेदवार आहेत.
ई-रिक्षाने २० किमीचा प्रवास!
कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचा झेंडा नाही की कार्यकर्त्यांची फौज नाही. हबीबा आपले पती मसूद राणा आणि लहान बाळासह एका बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षातून प्रचार करत आहेत. आतापर्यंत त्यांनी साधारण २० किलोमीटरचा भाग पालथा घातला आहे. ई-रिक्षातून उतरून त्या थेट बाजारात, चहाच्या टपरीवर जाऊन लोकांशी संवाद साधतात.
जमीन गहाण ठेवून निवडणुकीचा खर्च!
निवडणुकीच्या खर्चाबाबत हबीबा अत्यंत पारदर्शकपणे बोलल्या. त्यांच्या पतीने १.७० लाख टका जमवण्यासाठी आपली जमीन गहाण ठेवली आहे. "माझ्याकडे पैसा नाही, पण लोकांचे प्रेम आणि पाठिंबा आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एका बाजूला बलाढ्य उमेदवार आणि दुसरीकडे ई-रिक्षातून फिरणारी ही सामान्य महिला, असा हा लढा आता संपूर्ण बांगलादेशाचे लक्ष वेधून घेत आहे.
Web Summary : Habiba Begum, a Bangladeshi independent candidate, faces adversity. Jailed seven times, she campaigns with her baby in an e-rickshaw. She mortgaged land for the election, embodying resilience and connecting with the people.
Web Summary : बांग्लादेश में निर्दलीय उम्मीदवार हबीबा बेगम संघर्ष कर रही हैं। सात बार जेल गईं, बच्चे के साथ ई-रिक्शा से प्रचार कर रही हैं। चुनाव के लिए जमीन गिरवी रखी, लोगों से जुड़कर साहस दिखा रही हैं।