बलूचिस्तान ट्रेन हायजॅकला २४ तासाहून अधिक काळ लोटला तरीही पाकिस्तान त्यांच्या बंदी सैनिकांना सोडवू शकली नाही. त्यातच बलूच लिबरेशन आर्मी(BLA) ने पाकिस्तान सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. आमच्याकडे अद्यापही २०० हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवलं आहे. पाकिस्तान सरकारला २४ तास देतो, जर यात आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल असं बीएलएने पाकिस्तानी सरकारला इशारा दिला आहे.
४८ तासांचा दिला होता अल्टिमेटम
या अल्टिमेटममध्ये BLA ने म्हटलंय की, बलूच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी मागील २४ तासापासून जाफर एक्सप्रेस आणि त्यातील ओलीस प्रवाशांवर नियंत्रण ठेवले आहे. गुप्तचर संस्था, पोलीस आणि अर्धसैन्य दलासह २०० हून अधिक जवान बीएलएच्या ताब्यात आहेत. हे लोक थेट राज्यात दहशत निर्माण करणे, लोकांना बळजबरीने गायब करणे, हत्या करणे आणि बलूचच्या जमिनीवर लूट करणे यात सहभागी आहेत. युद्धाच्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आणि मानवाधिकार लक्षात घेता कैद्यांच्या अदलाबदलीसाठी पाक सरकारला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता परंतु पाक सरकार त्यांचा हट्ट, उदासीन धोरण आणि उडवाउडवीच्या उत्तराने त्यांना सुरक्षा जवानांना वाचवायचं नाही हे दाखवून देतंय असं सांगितले.
बलूच कोर्टात करणार हजर
आता एक दिवस गेला आहे, पाकिस्तानकडे आता फक्त २४ तास उरलेत. जर पाकिस्तानला दिलेल्या अल्टिमेटममध्ये कैद्यांची अदलाबदली केली नाही तर सर्व ओलीस प्रवाशांना बलूच राष्ट्रीय कोर्टासमोर हजर करेल. त्याठिकाणी या लोकांवर अत्याचार, लूट, नरसंहार, शोषण आणि युद्ध गुन्हेगाराचा खटला दाखल करेल. ओलीसांविरोधात जो खटला चालेल तो तातडीने निष्पक्ष आणि पारदर्शी असेल. दोषी आढळल्यास बलूचच्या राष्ट्रीय कायद्यानुसार दंड होईल. आम्ही सर्व काही ठीक करू असं जर पाकिस्तानी सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे असंही बलूच आर्मीने बजावलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने ओलीस ठेवलेल्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बीएलएच्या बंडखोरांनी ओलीस ठेवलेल्यांमध्ये काही सुसाईड बॉम्बर्सही बसवले आहेत. या बॉम्बर्सने सुसाइड जॅकेट घातलं असून त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला बंधक बनवलेल्यांना सोडवणं कठीण झाले आहे. बलूच आर्मीने ट्रेन हायजॅक व्हिडिओ जारी केला असून त्यात ट्रेन तिच्या गतीत पुढे जात असताना अचानक स्फोट होतो आणि ट्रेन थांबते. त्यानंतर डोंगरातून बीएलएचे बंडखोर येताना दिसतात आणि ट्रेन हायजॅक करतात.