जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत होत असताना अमेरिकेतील न्यू ऑरलियन्स येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडले. तसेच त्यानंतर हल्लेखोरांने ट्रकमधून उतरून बेछूट गोळीबार केला. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे ३.१५ च्या सुमारास नाइल लाईफ आणि व्हायब्रंट कल्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या बोरबन स्ट्रीट आणि इबविर्ले चौकात घडली. दरम्यान, हा हल्ला दहशतवादी हल्ला होता की आणखी काही याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार भरधाव ट्रक घेऊन आलेल्या हल्लेखोराने उपस्थितांना चिरडल्यावर ट्रकमधून उतरून गोळीबार करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, त्यात घटनास्थळावर उपस्थित लोक दिसत आहेत. तसेच गोळीबाराचा आवाजही येत आहे. रस्त्यावर जखमी झालेले लोकही दिसत आहेत.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनेक लोकांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार न्यू ऑरलियन्स पोलिसांनी संशयितावर गोळीबार केला. मात्र त्याच्याबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर पीडितांना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.