पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाकिस्तानचे १९ सैनिकांचा मृत्यू झाला. तर, लष्कराच्या कारवाईत ४५ दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवाद्यांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले. १० ते १३ सप्टेंबर दरम्यान खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी या चकमकी झाल्या.
रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासह बानू येथे भेट दिली आणि एका उच्चस्तरीय बैठकीत भाग घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानची मोहीम कोणतीही तडजोड किंवा संदिग्धता न ठेवता पूर्ण ताकदीने सुरू राहील.
वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ यांनी आरोप केला की, पाकिस्तानातील हल्ल्यांसाठी जबाबदार असलेले दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार अफगाणिस्तानातून कारवाया करत आहेत. दहशतवादी घटनांमध्ये घुसखोर अफगाण नागरिकांचा सहभाग असल्याचा दावा करत, त्यांनी पाकिस्तानात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अफगाण नागरिकांना परत पाठवण्याची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले.
पंतप्रधान शरीफ म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण किंवा दिशाभूल करणारी विधाने स्वीकारणार नाही. या भेटीदरम्यान, पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी बन्नू येथील लष्करी रुग्णालयात जखमी सैनिकांचीही भेट घेतली.
पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग आयएसपीआर (ISPR) नुसार, बाजौर जिल्ह्यात गुप्तचर यंत्रणांवर आधारित कारवाईत २२ बंडखोर मारले गेले.दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यात १३ दहशतवादी मारले गेले. तर, १२ सैनिकांचा मृत्यू झाला. लोअर डेर जिल्ह्यात लाल किल्ला मैदानात झालेल्या दुसऱ्या कारवाईत १० दहशतवादी आणि ७ सैनिक मारले गेले. या कारवायांमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.