इस्लामाबाद: पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटचे सहकारी व सत्ताधारी पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे एक संस्थापक सदस्य डॉ. आरिफ अल्वी यांनी रविवारी पाकिस्तानचे १३ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली.दातांचे डॉक्टर असलेले अल्वी ६९ वर्षांचे असून, ‘ऐवान-ए-सद्र’ या अध्यक्षीय प्रासादात झालेल्या साध्या समारंभात सरन्यायाधीश न्या. सादिक निसार यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान इम्रान खान व लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यासह अनेक वरिष्ठ मुलकी व लष्करी अधिकारी उपस्थित होते. डॉ. अल्वी यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेले. त्याआधी त्यांचे वडील पं. जवाहरलाल नेहरू यांचे व्यक्तिगत दाताचे डॉक्टर होते. सन १९६९ मध्ये विद्यार्थी चळवळीपासून डॉ. अल्वी यांनी राजकारणात प्रवेश केला. निदर्शने करताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक गोळी त्यांच्या उजव्या दंडात घुसली. आजही ती गोळी त्यांच्या दंडात आहे. (वृत्तसंस्था)
आरिफ अल्वी झाले पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 04:19 IST