Donald Trump News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार धोरणासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या स्टील व अॅल्युमिनियमवरील आयात कर तब्बल २५ टक्के वाढवला आहे.
आताच 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हा निर्णय घेण्यामागे त्यांचा उद्देश अमेरिकेतील उद्योगांचे संरक्षण करणे आणि व्यापार संतुलनात सुधारणा करणे हा आहे. ट्रम्प यांनी रविवारी (९ फेब्रुवारी) न्यू ऑरलियन्समधील एअर फोर्स वन येथे माध्यमांशी बोलताना याची घोषणा केली. 'आयातीवरील हा व्यापार कर तातडीने लागू केला जाणार आहे', असे ट्रम्प यांनी सांगितले.
कोणत्या देशांवर २५ टक्के कर?
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार कर २५ लागू करण्याची घोषणा केली असली, तरी हा निर्णय कोणत्या देशांसाठी आहे, याबद्दल स्पष्ट केलेले नाही. अमेरिकाही इतर देशांप्रमाणेच व्यापार कर ठेवेल, असे मात्र त्यांनी स्पष्ट केले. जर इतर देशांनी आमच्याकडून व्यापार कर घेतला, तर आम्हीही त्यांच्याकडून घेऊ, असे ट्रम्प म्हणाले.
आधी किती होता व्यापार कर?
ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे २०१६-२०२० या दरम्यान, स्टीलवर २५ टक्के, तर अॅल्युमिनियमवर १० टक्के व्यापार कर लागू केला होता. नंतर कॅनडा, मेक्सिको आणि ब्राझीलसह इतर व्यापारातील भागादरांना यातून मुभा देण्यात आली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासून निर्णयांचा धडाकाच सुरू केला आहे. इतर देशावर टॅरिफ अर्थात व्यापार कर लावण्याबरोबरच अमेरिकेत राहत असलेल्या अवैध नागरिकांना परत पाठवण्याचाही त्यांनी निर्णय घेतला. या निर्णयाची खूपच चर्चा झाली आहे.