वॉशिंग्टन- अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनानं सोमवारी 60 राजनैतिक अधिका-यांची हकालपट्टी केली आहे. तसेच अमेरिकेनं रशियाचं सिएटल येथील दूतावास बंद करण्याचे आदेशही दिले आहेत. अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियाला धडा शिकवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ब्रिटनच्या गुप्तहेराला विष देण्याच्या प्रकरणात रशियाचाही हात असल्याचा युरोपियन महासंघाचा आरोप आहे. त्यामुळेच अमेरिकेनं 60 राजनैतिक अधिका-यांना निलंबित करत रशियाचं सिएटल येथील दूतावासही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यानं सांगितलं की, सर्व 60 रशियन राजनैतिक अधिकारी अमेरिकेच्या राजनैतिक संरक्षणाच्या नावाखाली हेरगिरी करत होते. त्यातील जवळपास डझनांहून अधिक राजनैतिक अधिका-यांना रशियानं एका उद्देशानं पाठवलं होतं. अशा प्रकारच्या घटना अमेरिकेला स्वीकारार्ह नाहीत, असा कडक संदेश ट्रम्प प्रशासनाला यातून द्यायचा आहे, असेही तो अधिकारी म्हणाला.
अमेरिकेनं 60 रशियन राजनैतिक अधिका-यांची केली हकालपट्टी, ट्रम्प प्रशासनाची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 20:27 IST