रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या ३ वर्षापासून युद्ध आहे. नुकतेच पुतिन यांनी युद्धविरामाबाबत युक्रेनशी थेट चर्चेचे भाष्य केले आहे. त्यातच रशियानं आणखी एक नवीन मोर्चा उघडला आहे. फिनलँडच्या सीमेनजीक ४ महत्त्वाच्या ठिकाणांवर रशियाने सैन्यांची संख्या वाढवली आहे. सॅटेलाईट इमेजद्वारे हे समोर आले आहे. तुर्कीत रशिया आणि युक्रेन यांच्यात संभाव्य बैठक होणार आहे. मात्र व्लादिमीर पुतिन यांची सीक्रेट तयारी युरोपला चिंतेत टाकणारी आहे. स्वीडन इथल्या ब्रॉडकास्टर Planet Labs ने हे सॅटेलाईट फोटो जारी केलेत. ज्यात रशिया ४ ठिकाणी कामेनका, पेत्रोजावोडस्क, सेवेरोमॉर्स्क २ आणि ओलेन्या याजागी वेगाने सैन्य कारवाया वाढताना दिसत आहेत.
कामेनका फिनलँड सीमेपासून केवळ ३५ मैल दूर अंतरावर आहे. या भागात फेब्रुवारीपासून आतापर्यंत १३० हून अधिक मिलिट्री टेंट लावले आहेत. इथं जवळपास २ हजार सैनिक तैनात आहेत. पेत्रोजावोडस्क फिनलँड सीमेपासून १०९ मैलावर आहे. इथं ३ मोठे स्टोरेज हॉल बनवण्यात आलेत जिथे ५०-५० वाहने ठेवली जाऊ शकतात. या हॉलची खरी संख्या लपवली जात आहे. तिसरं ठिकाण सेवेरोमॉर्स्क २, जिथे सॅटेलाईट फोटोत अनेक हेलिकॉप्टर दिसून आलेत. हा बेस रशियाच्या एअर ऑपरेशन्ससाठी महत्त्वाचा मानला जातो. ओलेन्या याठिकाणी युक्रेननं अनेकदा जमिनीवरील हल्ले केल्याचा दावा केला तिथेही नव्या हालचाली दिसून येत आहेत.
फिनलँड-स्वीडन NATO सहभागी झाल्यानं वाढला तणाव
अलीकडेच फिनलँड आणि स्वीडन नाटो सदस्य बनले आहेत अशावेळी रशियाकडून ही तयारी सुरू आहे. युक्रेनवर २०२२ साली रशियाने हल्ला केल्यानंतर फिनलँड एप्रिल २०२३ साली NATO मध्ये सहभागी झाला. त्यानंतर मार्च २०२४ साली स्वीडननेही नाटोचं सदस्यत्व घेतले. रशिया सातत्याने NATO वर आक्रमण होण्याचा आरोप करते, आम्ही कठोर पाऊले उचलू सांगते. आता सॅटेलाईट फोटोवरून रशियाचा इशारा प्रत्यक्षात दिसून येत आहे.
दरम्यान, या सॅटेलाईट फोटोमुळे २०२१ च्या आठवणी ताज्या झाल्यात. जेव्हा युक्रेन बॉर्डरवर अशाच प्रकारे हालचालीनंतर २०२२ मध्ये रशियाने हल्ला केला होता. फिनलँडचे डिप्टी चीफ डिफेन्स लेफ्टिनंट जनरल वेसा विर्टानेन यांनी रशिया NATO ची एकता आजमवत आहेत असं म्हटलं तर आम्ही जेव्हा नाटोमध्ये सहभागी झालो तेव्हा रशियाने उत्तर देऊ म्हटलं होते, आता ते खरे होताना दिसतंय असं स्वीडनचे डिफेन्स चीफ माइकल क्लेसन यांनी सांगितले.