मनिला: नेपाळनंतर आता फिलीपिन्समध्येही सरकारविरोदात जनता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी राजधानी मनिला येथे हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. गर्दी इतकी मोठी होती की पोलिसांनाही नियंत्रित करण्यात अडचण आल्या.
लोक रस्त्यावर का उतरले?
हा विरोध एका मोठ्या भ्रष्टाचार घोटाळ्याविरोधात होता. आरोप आहे की, खासदार, सरकारी अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी बंधारे व पूरनियंत्रण प्रकल्पांमध्ये प्रचंड प्रमाणात लाचखोरी केली आणि देशाच्या आपत्तीप्रवण भागात गरीबांसाठी असलेला सरकारी निधी लुटला. संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी पोलिस आणि सैन्य सतर्क ठेवण्यात आले आहेत. मनिलातील लोकशाही स्मारकाजवळ, ऐतिहासिक उद्यान परिसरात आणि EDSA महामार्गाजवळ मोठ्या संख्येने पोलिस तैनात केले आहेत.
इतर देशांचा आपापल्या नागरिकांना इशारा
सरकारविरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आणि फिलिपाईन्सचे झेंडे फडकावले. तसेच, “आता पुरे झाले, यांना तुरुंगात टाका” अशा घोषणा दिल्या. विद्यार्थी नेत्या अल्थिया ट्रिनिडाड म्हणाल्या की, गरिबीत जगताना आम्हाला वेदना होतात. आमचे घर आणि भविष्य उद्ध्वस्त होत आहे. हे लोक आमच्या कराच्या पैशातून आलिशान गाड्या विकत घेतात, परदेश दौरे करतात आणि मोठे व्यावसायिक व्यवहार करतात. दरम्यान, या आंदोलन आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दूतावासांनी आपल्या नागरिकांना आंदोलनाच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला आहे.
पूरनियंत्रण प्रकल्पात मोठा घोटाळा
फिलिपाईन्समधील अनेक पूरनियंत्रण प्रकल्प निकृष्ट दर्जाचे होते किंवा प्रत्यक्षात झालेच नाहीत. विशेषत: बुलाकान प्रांतातील रहिवासी म्हणतात की, त्यांचे परिसर वारंवार पूरात अडकतो, तरीही प्रकल्प कागदावरच राहिले. कॅथोलिक बिशप कॉन्फरन्सचे प्रमुख कार्डिनल पाब्लो वर्जिलिओ डेविड यांनी म्हटले की, आमचा उद्देश अस्थिरता निर्माण करणे नाही, तर लोकशाही बळकट करणे आहे.
हिंसा टाळण्याचे आवाहन
कार्डिनल डेविड यांनी लोकांना शांततामय मार्गाने आंदोलने करण्याचे आणि जबाबदारी निश्चित करण्याचे आवाहन केले. आयोजकांनी स्पष्ट केले की, त्यांचा उद्देश भ्रष्ट खासदार, सार्वजनिक बांधकाम अधिकारी आणि बांधकाम कंपन्यांच्या मालकांना बेनकाब करणे आहे. राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केलेली नाही.
घोटाळा नेमका कसा उघड झाला?
राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनियर यांनी जुलै महिन्यातील राष्ट्राला दिलेल्या भाषणातच या पूरनियंत्रण प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी एक स्वतंत्र चौकशी आयोग नेमला, ज्याने ९,८५५ प्रकल्पांची चौकशी सुरू केली. या प्रकल्पांची किंमत तब्बल ५४५ अब्ज पेसो (सुमारे ९.५ अब्ज डॉलर) इतकी असल्याचे सांगितले जाते. राष्ट्राध्यक्षांनी या भ्रष्टाचाराला अतिशय भीषण म्हटले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा राजीनामा घेतला.