मनिला - नेपाळ, फ्रान्स व इंडोनेशियानंतर फिलिपिन्समध्ये सकारच्या भ्रष्टाचाराविरोधात जनतेमध्ये जनआक्रोश दिसून येत आहे. सरकारच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ रविवारी हजारो लोक रस्त्यावर उतरले.
राजधानी मनिला शहरातील ऐतिहासिक मनिला पार्कसह मुख्य ईडीएसए महामार्गावर लोकांनी एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून सुरक्षा दलाचे हजारो जवान व पोलिस दल तैनात केल्याने अनुचित प्रकार घडला नाही. पूर नियंत्रण प्रकल्पाच्या माध्यमातून खासदार, सरकारी अधिकारी, व्यापारी यांनी संगनमत करून सरकारी निधी लुटल्याचा आरोप आंदोलकांकडून होत आहे. रविवारी सकाळी या आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर काही तासात हजारो आंदोलक रस्त्यांवर उतरले.
ते आमच्या पैशांतून परदेशात फिरताहेतआम्ही गरिबीत जगत असून घरे व भविष्य गमावतो आहोत. ते मात्र आमच्या कराच्या पैशांतून महागड्या गाड्या खरेदी करण्यासोबत परदेशात जाऊन मौजमजा करत आहेत. जिथे लोकांचा गैरवापर होणार नाही, अशी व्यवस्था आम्हाला हवी आहे, अशा प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी झालेल्या अल्थीया त्रिनिदाद नामक विद्यार्थ्याने दिली आहे.