वॉशिंग्टन : मृत्यूनंतरही शरीरातील काही भाग जिवंत राहतात, असे एका नव्या अभ्यासात आढळून आले आहे. काही प्रकरणांत मृत्यूनंतर जनुक अभिव्यक्ती (डीएनएतील माहितीचे प्रथिने आणि इतर लहान कणाशी एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया) प्रत्यक्षात वाढल्याचे दिसून येते, असे एका नव्या शोधनिबंधात म्हटले आहे. हा शोधनिबंध ओपन बॉयलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. एखाद्या जीवाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यातील सर्व पेशी मेलेल्या नसतात, असे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आणि अलाबामा स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक पीटर नोबल यांनी सांगितले. वेगवेगळ्या पेशींचा जीवनकाळ, दोन पिढ्यांतील सरासरी अंतर आणि अत्युच्च तणावाप्रसंगीची लवचिकता वेगवेगळी असते. काही पेशी तर त्या जिवाच्या मृत्यूनंतरही जगण्यासाठी धडपडताना दिसून आल्या. काही पेशी विशेष करून मातृपेशी जिवंत राहतात आणि स्वत:ला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत असण्याची शक्यता आहे, असे नोबल म्हणाले.
मृत्यूनंतरही शरीराचे काही भाग राहतात जिवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 00:36 IST