जयपुरा : इंडोनेशियाच्या पापुआ गिनी प्रांताला ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला असून, या भूकंपामुळे दोन इमारतींचे नुकसान झाले आहे, तर एक किशोरवयीन मुलगा नदीत पडल्यानंतर बेपत्ता झाला आहे. अमेरिकेच्या जिआॅलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार राजधानी जयपुरापासून २५० कि.मी. अंतरावर पापुआ गिनीच्या डोंगराळ भागात हा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र ५२ कि.मी. खोल भूगर्भात होते.आपदा संघटनेचे प्रवक्ता सुतोपो पूर्वो नुग्रोहो यांनी केलेल्या दाव्यानुसार भूकंपाचा धक्का चार सेकंद अगदी तीव्रतेने जाणवला. मदत कार्यकर्ते भूकंपग्रस्त भागात पोहोचण्याचा प्रयत्न करीत असून, त्याला आणखी काही तास लागतील. भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळील कासोनावेजा शहरात एक घर कोसळले असून दुसऱ्या घराचे नुकसान झाले आहे. एका रुग्णालयाच्या भिंती कोसळल्यामुळे रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
इंडोनेशियामध्ये ७ तीव्रतेचा भूकंप
By admin | Updated: July 29, 2015 01:35 IST